महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन असतील NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, जे पी नड्डा यांनी केली घोषणा

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना जे पी नड्डा म्हणाले की, “आम्ही विरोधी पक्षांशीही संवाद साधू. उपराष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आम्हाला त्यांचा पाठिंबाही मिळाला पाहिजे. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आताही आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. आमच्या सर्व एनडीए मित्रपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी आमचे एनडीए उमेदवार आहेत.”

राधाकृष्णन 21 ऑगस्ट रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या दरम्यान, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

दरम्यान, जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता. मात्र त्यांनी अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने यापदासाठी आता निवडणूक होत आहे.