
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकेल असे सर्वच एक्झिट पोल सांगत होते. प्रत्यक्षात भाजप आघाडी जिंकली. निवडणुकीआधी अचानक वाढलेल्या 1 कोटी मतदारांमुळे हे घडले. जिथे जिथे मतदार वाढले, तिथे भाजप जिंकला. हे वाढीव मतदार निवडणूक आयोगाने जादूने जन्माला घातले होते, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
देशातील मतचोरी व बिहारमधील मतदार फेरतपासणीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढण्यात आली आहे. त्या यात्रेला पहिल्याच दिवशी रस्त्यावर तुफान गर्दी उसळली. या यात्रेला संबोधित करताना राहुल बरसले. ‘महाराष्ट्रात लोकसभेला इंडिया आघाडीला जितकी मते पडली होती, तितकीच विधानसभेला पडली. आमचे एकही मत कमी झाले नाही. मात्र वाढलेली सगळी मते भाजपला मिळाली. आम्ही आयोगाकडे व्हिडिओग्राफी मागितली. ती नाकारली गेली. त्यानंतर आम्ही कर्नाटकात तपास केला तेव्हा मतचोरी चव्हाटय़ावर आली, असे राहुल म्हणाले.
बिहारची निवडणूक चोरू देणार नाही!
‘मताधिकार यात्रा ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. संपूर्ण हिंदुस्थानात आरएसएस आणि भाजप संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदुस्थानात विधानसभा व लोकसभा निवडणुका चोरी केल्या जात आहेत. बिहारमध्ये काही मतदार जोडून आणि काहींना वगळून निवडणूक चोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ही निवडणूक त्यांना चोरू देणार नाही. बिहारची जनता चोरी करू देणार नाही, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
मतचोरीचे पुरावे मी दिल्यानंतर माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले जात आहे. मात्र, भाजपच्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन वायनाड आणि कन्नौज मतदारसंघाचे आकडे दिले. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र का मागितले जात नाही.
सहानंतरची मते गेली कुठे? आज ‘सर्वोच्च’ सुनावणी
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या घोळाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सायंकाळी 6 नंतरची 76 लाख मते गेली कुठे? या मतांचा गोलमाल झाल्याचा दाट संशय आहे. संबंधित 76 लाख मतांचा डाटा निवडणूक आयोगाने सादर करावा, अन्यथा संपूर्ण विधानसभा निवडणूक प्रक्रियाच रद्द करावी, अशी विनंती याचिकेतून केली आहे. याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी अहिरे यांच्यातर्फे युक्तिवाद केला होता. तथापि, वाढीव मतांबाबत मीडियातील बातम्यांव्यतिरिक्त काहीही ठोस पुरावे दिले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अहिरे यांच्या वतीने अॅड. प्रतीक बोंबार्डे यांनी याचिका दाखल केली आहे.























































