कबुतरांना दाणे घालायचे का? पालिकेने मागितले मुंबईकरांचे मत

कबुतरांना खाद्य घालण्यास न्यायालयाने बंदी घातल्यानंतर दादर येथील कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद केला आहे. तरी मोठय़ा संख्येने कबुतरे अजूनही येथे आहेत. त्यांना चोरीछुपे दाणे घालण्याचा प्रयत्नही होत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. अशावेळी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने ठराविक वेळेत दाणे घालायचे का याबाबत पालिकेने मुंबईकरांकडून मते मागवली आहेत.

दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी ऍण्ड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील, ऑनिमल ऍण्ड बर्डस् राईटस् ऑक्टिविस्ट यांच्याकडून कबुतरखान्यांबाबत मुंबई महानगरपालिकेला अर्ज देण्यात आले आहेत. हे अर्ज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • नागरिकांनी कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य द्यावे की नको याबाबत 18 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान हरकती आणि सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
  • महापालिकेच्या [email protected] या ई-मेल आयडीवर हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ-दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-400 012’ या पत्त्यावरही सूचना व हरकती पाठवता येतील.