
वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांच्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वीच कृषिमंत्रीपदी आलेले दत्ता भरणे यांनाही हे खाते झेपतेय की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः भरणे यांनीच आपल्या वक्तव्यातून त्याची कबुली दिली आहे. कृषी खातं म्हणजे लई त्रास, क्रीडा खातंच बरं होतं, असे वक्तव्य भरणे यांनी इंदापूरमधील एका जाहीर कार्यक्रमात केले.
कृषिमंत्र्याला खूप पळावे लागते, फिरावे लागते. क्रीडा खात्यात बरं होतं. लई त्रास नव्हता, पण आता त्रास घ्यावाच लागेल, असे भरणे म्हणाले. कृषिमंत्री भरणे यांनी नंतर यावर सारवासारवही केली. कृषिमंत्री हा त्रास नाही तर जबाबदारी आहे, आपल्या नेत्यांनी टाकलेला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
कर्जमाफीवर फडणवीस, अजितदादांकडे बोट
शेतकऱयांच्या कर्जमाफीबद्दल बोलतानाही भरणे यांनी शेतकरी कुटुंबातच जन्माला आल्याने आपल्याला शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत आहेत असे सांगत कर्जमाफी 100 टक्के झालीच पाहिजे असे म्हटले. पण त्याचा निर्णय मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री घेतील असे सांगत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे बोट दाखवले.