नवी मुंबई विमानतळात होणार 50 हजार कोटींची गुंतवणूक; उद्घाटनाच्या दिवशीच होणार तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

नवी मुंबई विमानतळामध्ये अदानी समूह एकूण सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विमानतळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात समूहाने जवळपास २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तिसऱ्या टप्प्यावर ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने सुरू केली असून या कामाचे भूमिपूजन विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये धावपट्टी आणि टर्मिनल एक, टॅक्सी रनवे आदी कामांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड सुविधेमध्ये दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना सेवा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात एक कार्गो टर्मिनल देखील बांधले जात आहे, जे २०२६ मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, विमानतळाची क्षमता दरवर्षी पाच कोटी प्रवाशांना हाताळण्याची असणार आहे. सध्या तिसऱ्या टप्प्याचे डिझाईन सुरू आहे. हा प्रकल्प सुमारे ३० हजार कोटींचा असणार आहे. त्यामध्ये टर्मिनल २ आणि दुसऱ्या धावपट्टीव्यतिरिक्त, एपीएम (ऑटोमेटेड पीपल मूव्हर्स) आणि मेट्रोची कामेदेखील असणार आहेत, असे अदानी समूहाचे वित्तीय अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले.

तिसरा टप्पा साडेतीन वर्षात पूर्ण होणार
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत करण्याची तयारी व्यवस्थापनाने सुरू केली आहे. ज्या दिवशी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे त्याच दिवशी तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन होणार आहे. या टप्प्याचे काम साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. २०२९ पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे दुसरे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे, असेही अरुण बन्सल यांनी स्पष्ट केले आहे.

महिन्यात परवाना मिळणार
या महिन्याच्या अखेरीस विमानतळाला विमानतळाचा परवाना मिळण्याची शक्यता आहे, हा परवाना मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परवान्यासाठी कंपनीने खूप आधी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सुमारे २० दिवसांपूर्वीच तपासणी केली आहे. या विभागाचे अधिकारी पुन्हा एकदा येणार आहेत. त्यानंतर परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.