SIR चा वाद पेटणार; मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध विरोधी पक्ष महाभियोग आणण्याच्या तयारीत

बिहारमधील मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा (SIR) मुद्दा चांगलाच तापत आहे. मतचोरी आणि मतदार यादीतील अनागोंदीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी ही मुद्दा लावून धरला आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध (CEC) महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार विरोधी पक्ष करत आहेत. विरोधी पक्ष यावर विचारमंथन करत असल्याची माहिती मिळ आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ केल्याच्या आरोप आणि बिहारमधील मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाला विरोध याबाबत निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टपणे सांगितले की,’मतचोरी’ सारख्या कोणत्याही घटना घडलेल्या नाही. असे खोटे आरोप करत जनतेची दिशाभूल करण्यात येऊ नये. लोकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याचे आणि सर्व परिस्थितीत मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक आयोग स्वतः राजकीय पक्षांची नोंदणी करतो आणि त्यांच्या दृष्टीने कोणताही पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व समान आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की अशा खोट्या आरोपांचा आयोगावर किंवा मतदारांवर परिणाम होणार नाही. निवडणूक आयोग निर्भयपणे आणि निष्पक्षपणे काम करत राहील. त्यांनी पुनरुच्चार केला की आयोगाचे काम राजकारण करणाऱ्यांपासून प्रभावित न होता सर्व मतदारांना समान संधी सुनिश्चित करणे आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या फक्त चार महिने आधी, निवडणूक आयोगाने राज्याच्या मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) सुरू केले आहे, ज्याला विरोधी पक्ष तीव्र विरोध करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर वादविवाद सुरू झाला आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की या प्रक्रियेचा उद्देश केवळ प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत नोंदवले जावे आणि सर्व संशयास्पद किंवा अपात्र व्यक्तींची नावे यादीतून वगळली जावीत याची खात्री करणे आहे. परंतु विरोधकांचा आरोप आहे की या पावलामुळे कागदपत्रांअभावी कोट्यवधी पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला बिहारमधील मतदार यादीतून काढून टाकलेल्या सुमारे ६५ लाख नावांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याचे आणि ती का काढून टाकली याचे कारण सांगण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने न्यायालयाला आश्वासन दिले आहे की ते त्याची अंमलबजावणी करेल. या स्रव घडामोडी लक्षात घेता विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आय़ुक्तांविरोधात महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत.मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या शक्यतेवर काँग्रेस खासदार सय्यद नासिर हुसेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की या विषयावर पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु गरज पडल्यास काँग्रेस नियमांनुसार महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करण्यात येईल.