जबाबदारीपासून पळ काढत आहे निवडणूक आयोग, मतचोरीच्या मुद्यावरून गौरव गोगोई यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. बिहारमधील मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया जलदगतीने आणि जबाबदारीपासून पळ काढत राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना गौरव गोगोई म्हणाले, बिहारमधील एसआयआर अभियान सुरू करण्यापूर्वी आयोगाने राजकीय पक्षांशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच, 70 लाख नवीन मतदार जोडण्याच्या प्रक्रियेवर आयोगाने मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांशी संवाद का साधला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गोगोई पुढे म्हणालेकी, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर 70 लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, याबाबत आयोगाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही अधिकारी निष्पक्षपणे काम करत नाहीत, हे स्पष्ट आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. लोकशाही बळकट ठेवण्यासाठी मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो संविधानाने संरक्षित केला आहे. मात्र निवडणूक आयोग राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे, असे गोगोई म्हणाले म्हणाले.