कपिल बैंसलाचा अचूक निशाणा, आशियाई नेमबाजीच्या ज्युनियर गटात सुवर्ण

हरियाण्याच्या कपिल बैंसलाने कजाकिस्तानच्या श्यामपेंट येथे सुरू असलेल्या 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या ज्युनियर गटात (रायफल/पिस्तूल/शॉटगन) हिंदुस्थानसाठी पहिले सुवर्ण पदक जिंकण्याची कमाल करून दाखवली.

10 मीटर एअर पिस्तूल ज्युनियर पुरुष गटातील अंतिम फेरीत कपिलने 243.0 गुण मिळवत उझबेकिस्तानच्या इल्खोमबेक ओबिदजोनोवला अवघ्या 0.6 गुणांनी मागे टाकले. हिंदुस्थानच्या जोनाथन गेविन अँटनीने 222.7 गुणांसह कांस्य पदक जिंकले, तर पात्रता फेरीमध्ये त्याने 582 गुण मिळवत दुसरे स्थान संपादले होते. मुकेश नेलावलीने दमदार खेळ करत तिसरे स्थान मिळवले. यामुळे अंतिम फेरीत तीन हिंदुस्थानी नेमबाजांनी धडक मारत पराक्रम गाजवला होता. अंतिम फेरीत सुरुवातीला उझबेक खेळाडू आघाडीवर होता; पण 15व्या शॉटनंतर कपिलने पहिल्यांदा आघाडी घेतली. 20व्या शॉटनंतर प्रतिस्पर्ध्याने पुन्हा आघाडी मिळवली आणि शेवटच्या दोन शॉट्सआधी तो एका गुणाने पुढे होता. मात्र निर्णायक क्षणी कपिलने 10.8 आणि 10.6 गुण मिळवले, तर उझबेक खेळाडूला 9.4 गुणांवर समाधान मानावे लागले आणि येथेच हिंदुस्थानचे सुवर्ण निश्तिच झाले.