
उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे खून करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. आता असाच एक प्रकार राजस्थानमधील खैरथल जिल्ह्यात समोर आला आहे. किसनगडबास येथे एका ‘रिल’स्टार पत्नीने पतीचा खून करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला आणि तीन मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या आहेत.
रविवारी 17 ऑगस्ट रोजी खैरथल जिल्ह्यातील किसनगडबास येथे घराच्या छतावर ड्रममध्ये एका तिशीच्या वयातील तरुणाचा मृतदेह सापडला होता. धारधार शस्त्राने वार करत ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्यात आला होता आणि मृतदेहाचे लवकर विघटन व्हावे म्हणून त्यावर मीठ ओतण्यात आले होते. हा मृतदेह सडल्याने याचा वास येऊ लागला आणि स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस चौकशी दरम्यान सदर मृतदेह उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर येथे राहणाऱ्या हंसराम यांचा असल्याचे समोर आले. गेल्या दोन महिन्यांपासून ते पत्नी आणि मुलांसह भाड्याचे घर घेऊन राहत होते. हत्येनंतर हंसराम यांची पत्नी आणि तीन मुले गायब होते. तसेच घर मालकाचा मुलगाही बेपत्ता होता. अखेर पोलिसांनी वेगाने सूत्र हलवली आणि आरोपी पत्नी सुनीतासह तिचा बॉयफ्रेंड जितेंद्र याला खैरथल तिजारा येथून बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराम वीट भट्टीवर काम करत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो पत्नी आणि मुलांसह घराच्या छतावर भाड्याने राहत होता. हंसरामला दारूचे व्यसन होते आणि तो घरमालकाचा मुलगा जितेंद्र याच्यासह मद्यपान करायचा. तर हंसरामची पत्नी सुनीता हिला रील बनवण्याचे वेड होते आणि ती पतीसोबत रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करायची.
याच दरम्यान सुनीता आणि जितेंद्र यांचे सुत जुळले असावे आणि दोघातील प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनीता आणि जितेंद्र यांची कसून चौकशी सुरू केली आहे. ‘फ्री प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.