
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. खराब हवामानामुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. आठ विमानांचे मार्ग बदलून ती सूरत, अहमदाबाद आणि हैदराबादकडे वळवण्यात आली. यामध्ये इंडिगोच्या 6, स्पाइसजेटच्या 1 आणि एअर इंडियाच्या 1 विमानाचा समावेश आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने आणि धावपट्टीवरील पाण्यामुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरण्यात अडथळे निर्माण झाले. यामुळे प्रवाशांना तासंतास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना विमानतळावरच अडकून पडावे लागले.
हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील काही तास पावसाचा इशारा दिला आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थितीची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. मुंबईतील या परिस्थितीमुळे रस्ते वाहतूकही ठप्प झाली असून, लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.