
बिहारमधील नवादा येथे मंगळवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘वोटर अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी राहुल गांधींना मोठा भाऊ म्हणत महागठबंधन (आरजेडी-काँग्रेस-डावे गट) पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला सत्तेतून हटवून राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनवेल, असे ठामपणे सांगितले. नवादा येथील रोड शोमध्ये तेजस्वी यांच्या या घोषणेला उपस्थित समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
या यात्रेदरम्यान तेजस्वी यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि बिहारमधील नीतीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संगनमताने बिहारमधील मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे हटवली गेली आहेत. अनेक जिवंत मतदारांना मृत घोषित केल्याचा दावाही त्यांनी केला. तेजस्वी यांनी नीतीश सरकारला ‘अकार्यक्षम’ असल्याचे म्हटले/ बिहारच्या तरुणांना संधी देण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव म्हणाले की, नवादा येथे येऊन येथील लोकांना जागरूक केल्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांचे आभार मानतो. आता बिहारमधून एनडीएला उखडून टाकण्याची आणि बदलाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. यावेळी आपण सर्वजण मिळून राहुल गांधींना लोकसभेत पंतप्रधान बनवण्यासाठी काम करू.