
आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर करताना अनेक धक्के देत निवड समितीने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. त्याचबरोबर कसोटी कर्णधार शुभमन गिलला संघात बसवण्यासाठी त्याला उपकर्णधारपद देत त्याचे डिमोशन केले आणि यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर या मुंबईकरांना संघाबाहेर बसवण्याचा अन्यायकारक निर्णय खुद्द मुंबईकर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
कसोटी कर्णधारपद ही क्रिकेटमधील सर्वोच्च जबाबदारी सांभाळत असताना शुभमन गिलला आज उपकर्णधारपद देण्याचा अजब निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीने घेतला. आशिया कपसाठी श्रेयस अय्यरच्या निवडीची शक्यता असतानाही या अनुभवी मुंबईकराला डावलण्याचा प्रकार अजित आगरकर यांच्या समितीने करत क्रिकेटप्रेमींना निराश केले. त्याचबरोबर जैसवालही सलामीवीराच्या भूमिकेसाठी सज्ज असताना त्याला पुन्हा एकदा मोठय़ा स्पर्धेसाठी संघाबाहेर करण्याचा प्रकार निवड समितीने केला.
अय्यरमागे राजकारण नाही
श्रेयस अय्यरची निवड शंभर टक्के मानली जात होती. मात्र पुन्हा एकदा त्याला डावलण्यात आले आहे. त्याची संघात निवड न होणे याला न तो स्वतः जबाबदार आहे ना निवड समिती. त्याला वगळण्याबाबत कोणताही वाद नाही किंवा गैरसमजही नसल्याचे मत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले. आयपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱया या मुंबईकराला संघाबाहेर बसवण्यात कोणताही वाद नसला असे बोलले जात असले तरी तो पुन्हा एकदा बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या राजकारणाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्थी, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
अभिषेक-संजूवर विश्वास
आपल्या झंझावाती फलंदाजीने अवघ्या हिंदुस्थानी चाहत्यांची मने जिकणारा अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा निवडला गेला आहे, तर त्याच्या जोडीला संजू सॅमसनचीही निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवचे वाढते वय पाहता भावी कर्णधार म्हणून गिलची संघात जागा निर्माण करताना त्याला उपकर्णधारपदाचे बक्षीस देण्यात आले आहे. मधल्या फळीत तिलक वर्मा, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल आणि रिंकू सिंह यांचीही निवड करण्यात आली.
गोलंदाजीचे साधले संतुलन
मोहम्मद सिराजला विश्रांती देताना जसप्रीत बुमराच्या हातात पुन्हा एकदा हिंदुस्थानी गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या साथीला अर्शदीप सिंह, हर्षित राणा हे दोघे वेगवान गोलंदाज असतील. फिरकीवीर म्हणून कुलदीप यादवसह वरुण चक्रवर्थी, अक्षर पटेल असे संतुलन सांभाळण्यात निवड समितीने यश साधलेय.