
पाकिस्तान आणि ओमान या देशांनी हिंदुस्थानमध्ये होणाऱया पुरुषांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेतून मंगळवारी अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यांच्या जागेवर आता बांगलादेश आणि कझाकिस्तान या संघांना संधी देण्यात आली आहे.
बिहारच्या राजगीरमध्ये 29 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. हॉकी इंडियाच्या एका सूत्राने सांगितले की, ‘मंगळवारी सकाळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने हिंदुस्थानात येण्यास अधिकृत नकार दिला. ओमानची टीमही माघारी गेली. त्यामुळे बांगलादेश आणि कझाकिस्तानला ड्रॉमध्ये सामील करण्यात आले.’ पाकिस्तानच्या स्पर्धेतून माघारीबाबतची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. एक महिन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सुरक्षेच्या कारणांचा हवाला दिला होता, मात्र केंद्र सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मंजूर केला होता.
आशिया चषकाचा वैभवशाली इतिहास
आशिया चषक हॉकी स्पर्धेला 1982 मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे सुरुवात झाली. त्यानंतर ही स्पर्धा आशियाई हॉकीमधील सर्वात प्रतिष्ठत मानली जाते. स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण कोरिया सर्वात यशस्वी संघ ठरला असून त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.
आशिया चषक विजेत्याला वर्ल्ड कपचे तिकीट
आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याची एक मोठी संधी गमावली आहे. कारण आशिया चषक जिंकणाऱया संघाला वर्ल्ड कपचे थेट तिकीट मिळते. हॉकीचा पुढील वर्ल्ड कप 2026 मध्ये बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्समध्ये खेळवला जाणार आहे.