
मुंबईवर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. धोधो कोसळणाऱया पावसाने हाहाकार उडाला आहे. मुंबईच्या मधोमध वाहणाऱया मिठी नदीला पूर आल्याने कुर्ला क्रांतिनगरसह लगतच्या अनेक भागांत पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या टीमकडून या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून 350 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्राr मार्गावर भीषण स्थिती निर्माण झाली. अनेक वाहने पाण्यात अडकली. पवईत पुराच्या लोंढय़ात वाहून जाणाऱया तरुणाला मोठय़ा शर्थीने वाचवण्यात आले. मुंबईची अवस्था दयनीय झाली असून 26 जुलैच्या भयानक आठवणी डोळ्यापुढे उभ्या ठाकल्या आणि भीतीचा काटा उभा राहिला. धडकी भरवणाराच हा पाऊस ठरला. त्यात शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आल्याने मुंबई शहरात वर्दळ कमीच होती. घाबरगुंडीने मुंबईकर घरातच राहिले. त्यांना ‘पाऊस ऍरेस्ट’च घडली.
मुंबई शहरासह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई शहरात 79.27 मिमी, पूर्व उपनगरात 108.81 मिमी आणि पश्चिम उपनगरात 115.92 मिमी पावसाची नोंद झाली. दादर टीटी, हिंदमाता, शीव सर्कल, शेल कॉलनी, कुर्ला कमानी, चुनाभट्टी, वीरा देसाई रोड, अंधेरी सब वे, मालाड सब वे, ओशिवरा ब्रीज, आरे कॉलनी विविध भागांमध्ये पाणी साचले. पावसाचे पाणी इंजिनमध्ये गेल्यामुळे काही ठिकाणी गाडय़ा बंद पडल्या त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. अनेक नागरिक पावसातून वाट काढत ऑफिस गाठताना दिसत होते.
भांडूपला झाड कोसळून रिक्षांचे नुकसान
भांडूप पश्चिम मयुरेश पार्क येथील लेक रोड येथे झाड उन्मळून पडल्यामुळे 10 ते 12 रिक्षांचे नुकसान झाले. दिवसभरात शॉर्ट सर्किटच्या 17, घरे आणि झाड पडण्याच्या 63 तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या.
जगबुडीने ओलांडली धोका पातळी
खेड तालुक्यात गेले 6 दिवस कोसळऱया मुसळधार पावसाने शहरातील जगबुडी नदी सलग 5 वेळा धोका पातळीच्यावर गेली आहे. नारंगी नदीलादेखील पूर आल्याने पुराचे पाणी किनाऱयावरील भात शेतीत घुसले आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात 170 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. सलग चार दिवस पावसाने शतक पार केले आहे. दरम्यान, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खेड आगारातील ग्रामीण भागातील एकूण 158 फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत.जगबुडी आणि नारंगी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे खेड शहराशी खाडीपट्टा विभागाचा संपर्क तुटला आहे.
वशिष्ठीला पूर; चिपळूण शहर पाण्यात
वशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले असून शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. शहरातील बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम हा परिसर जलमय झाला आहे. वशिष्ठाr नदीची पाणी पातळी 5.56 मीटर असून ती इशारा पातळीवर वाहत असल्याने पुराचे पाणी शहरात शिरले आहे.
सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत
गेले दोन दिवस संततधार सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडण्यास सुरुवात केली आहे. जिह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण व राज्य मार्गावर पाणी आल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. एकंदरीत मुसळधार पावसामुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 106.87 च्या सरासरीने 854.96 मी.मी.पाऊस. पडला. तर सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात 230 मी.मी तर देवगड तालुक्यात 120 मी मी पाऊस पडला आहे.
आचरा मालवण रस्त्यावर पाण्यातल्या गाडीत कुटुंब अडकले
मुसळधार पावसामुळे जिह्यात पाणीच पाणी झाले आहे. आचारा मालवण रस्त्यावर सकाळी पाणी आली होती. या पाण्यात चारचाकी गाडी बंद पडली होती. वाहनात कुटुंब अडकले होते. वाहनचालकाने त्यांना सुखरूप बाहेर काढेल.
वसईतील पुरात अडकलेल्या 497 नागरिकांची सुटका
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका वसईच्या भोयदापाडा-राजावली परिसरातील चाळींनाही बसला. पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने 52 हून अधिक रहिवासी त्यात अडकले. त्यांच्यासह विविध ठिकाणांहून 497 नागरिकांची महापालिकेच्या अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱयांनी सुखरूप सुटका केली. एनडीआरएफचे पथकही कार्यरत असून पूरग्रस्तांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवले आहे. तेथे त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था पालिकेने केली आहे.
वसईचा मधुबन परिसर पाण्याखाली
वसई पूर्वेतील मधुबन परिसर आज पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. दुचाकी व चारचाकी वाहने बुडाली असून अनेक गाडय़ांचे नुकसान झाले आहे. मधुबन संकुल ही उच्चभ्रूंची वस्ती असून जवळच मिठागर व राजावली खाडी आहे. या खाडीचे पाणी वसाहतीत घुसल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
मिठागरामध्ये नागरिक पुराच्या विळख्यात
वसई पूर्वेतील मिठागर भागातदेखील 300 नागरिक पुराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांच्या घरांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शहरी भागाशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी मिठागर येथे पूर येतो. त्यामुळे आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. त्यांच्यापर्यंत प्रशासनाने अन्नाची पाकिटे पोहोचवली आहेत.
महाराष्ट्रात पावसाचे 16 बळी
राज्यात तुफान पावसाच्या तडाख्याने गेल्या 24 तासांच 16 बळी गेले आहेत. भांडुपमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर मराठवाडय़ात 11 जणांचा मृत्यू झाला. अन्य दुर्घटनांत 4 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अनेक भागांत पूरस्थिती आहे.
आज वादळी वाऱयासह बरसणार
मुंबईत उद्यादेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 45 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला.
ठाणे, पालघर, रायगडातील शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी
उद्या बुधवारीदेखील ठाणे, पालघर व रायगड जिह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
शिवसैनिकांनो, मदतीला उतरा; आदित्य ठाकरे यांचे आवाहन
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मदतीला उतरण्याचे आवाहन केले. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे सगळ्यांचेच हाल होत आहेत. त्यामुळे मी सर्वच शिवसैनिकांना विनंती करतो की, जिथे गरज असेल तिथे मदतीला उतरा. गरजवंताना आवश्यक ती मदत करा, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.