राज्यातील समस्येबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होत असेल, तर त्यात अयोग्य काय? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबात चर्चा करण्याची गरज नाही. राज्याच्या समस्यांबाबत दोन नेते भेटत असतील, तर त्यात अयोग्य काय आहे? असा सवालही त्यांनी केला. राज्यातील दोन प्रमुख नेते भेटत आहेत. त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे आहेत, दोन नेते भेटत असतील तर त्यात अयोग्य काय आहे. कशासाठी भेट होतोय. काय चर्चा झाली , हे तेच नेते सांगू शकतात. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असेल असे तुम्ही म्हणता, तर याबाबत त्या नेत्यांनीच सांगितले पाहिजे. राज ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा पाहता, ते या भेटीबाबत स्पष्टपणे बोलतील, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे म्हणजे राजकीय अपराध नाही. उद्या आमचे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यासंदर्भात किंवा समाजिक काही काम असेल तर त्यांनीही भेटले पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते राज्यातील 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनीही या पदाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे पंतप्रधान आहेत, असे आम्ही म्हणतो. त्याला कारणे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी एका गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नाही, ही प्रतिमा त्यांनी पुसली पाहिजे. आता मिंधे गट त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही. ते अजूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानतात. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे आम्ही मानतो, असे ते म्हणाले.

बेस्ट पतपेढीची निवडणूक ही दिल्लीतील चर्चेचा विषय ठरू शकत नाही. ती पतपेढी आमच्याकडे नव्हती. काही लोकं एकत्र येत त्यांनी निवडणूक लढवली असेल. हा एवढा गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. या विषयावर मी बोलत नाही. याबाबत बोलण्यासाठी आमचे वेगळे प्रवक्ते आणि नेते आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली, त्यांना हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. हा विषयच आपल्याला माहिती नसल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.