
शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सिडकोतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यावर परखड मत व्यक्त केले. अमित शहा आणत असलेल्या कायद्याचा पहिला प्रयोग संजय शिरसाठ यांच्यावर व्हायला हवा, असे ते म्हणाले. हा स्थानिक राजकारणाचा विषय नसून हा राज्यातील ऐतिहासिक भूखंड घोटाळा आहे, असेही ते म्हणाले.
सिडकोमध्ये 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही, याचे उत्तर द्यावे. बिवलकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून, बेकायदेशीररित्या, ते कायदेशीर हक्कदार नसताना 5 हजार एकर वनजमीन ज्याप्रकारे 25 दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी केला. हे त्यांचे सर्व आदेश, हे सर्व सरकारी कागदपत्रे जनतेसाठी खुले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आता मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा नवीन कायदा अमित शहा आणू इच्छित आहेत, तर तो पहिला प्रयोग संजय शिरसाठ यांच्यावर होण्याची गरज आहे. गणेश नाईक त्या भागातील प्रमुख नेते आहेत. ते भाजपचे मंत्री आहेत. हे स्थानिक राजकारण नाही. 50 हजार कोटींचा भूखंड घोटाळा हा राज्यातील ऐतिहासिक भूखंड घोटाळा आहे. मुंबईत गेल्यावर या विषयावर पुढे काय करायचे, याची आमची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबतची कागदपत्रे मागवून घेतली आहेत.
त्यांनी शेण खाल्ले आहे, स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्यांच्या तोडांचा वास घ्यायचा असे त्यांचे सुरू आहे. 50 हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. त्यातील 20 हजार कोटी एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाठ यांना मिळाले आहेत. त्यातले 10 हजार कोटी दिल्लीतील बॉसपर्यंत आलेत, असे त्यांचे नेते सांगत आहेत. त्यामुळे यात सर्वात जास्त बदनामी अमित शहा यांची झालेली आहे. ही आपण स्वतः त्यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.