
आपली बायको अथवा प्रेयसी सुंदर, देखणी दिसावी अशी प्रत्येक पुरुषाची इच्छा असते. यासाठी तिला हव्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी तिचा नवरा करतो. मग महागडे कपडे असो इतर खर्च. पण आपली बायको बॉलीवूड़च्या हिरोईन सारखी दिसावी यासाठी भयंकर उपाय करणारा एक व्यक्ती सध्या भलताच चर्चेत आहे. कारण तो त्याच्या बायकोला तासंतास जिम करण्याचा आग्रह करतोय. एवढेच नाही तर डायटिंगच्या नावाखाली तिला उपाशी ठेवतो. एवढच नाही तर परफेक्ट फिगरसाठी तिचा गर्भपातही केला. या सगळ्या गोष्टी अनेक महिने सहन करुन आता असह्य झाल्याने तिने पोलिसांत धाव घेतली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधील हे एक प्रकऱण आहे. मुरादनगर इथं राहणाऱ्या तरुणीचं याच वर्षी मार्च महिन्यात मेरठ इथं राहणाऱ्या एका शिक्षकासोबत झालं. शिवम उज्वल असे त्या शिक्षकाचे नाव असून शानू शानवी असे त्या पीडित महिलेचे नाव आहे. लग्नामध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी 24 लाखांची महिंद्रा स्कार्पिओ कार, रोख रक्कम आणि दागिने दिले होते. या लग्नात पीडितेच्या वडिलांना 75 लाख रुपये खर्च आला होता. लग्नात इतका खर्च करून सुद्धा शिक्षक नवऱ्यानं पीडितेला त्रास दिला.
महिलेनं तक्रारीत काय सांगितलं?
पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये तिने सांगितले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने तिच्यासोबत एका खोलीत झोपायला नकार दिला. लग्नानंतर तो माच्याशी अजिबात नीट वागायचा नाही. तुझी उंची फार कमी आहे, दिसायलाही सुंदर नाहीस, असं म्हणत तो सारखं माझ्या शरीरावर कमेंट करायचा. माझा सतत राग करायचा. त्याचे आई वडिल आणखी पैशांची मागणी करत होते.
तुझ्याशी लग्न करून माझं नशीब फुटलं, मी थांबलो असतो तर नोरा फतेही सारखी सुंदर बायको मिळाली असती, असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तो मला रोज जिममध्ये पाठवायचा. तिथे 3-3 तास व्यायाम करायला लावायचा आणि नोरा फतेही सारखी फिगर बनवण्यासाठी दबाव टाकायचा. फिगर चांगली व्हावी म्हणून तो मला जेवण सुद्धा देत नव्हता. कधी कधी मारहाणही करायचा, असे पीडितेने तक्रारीत म्हंटले आहे.
पीडितेचं म्हणणं आहे की, तिचे सासु-सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र कुठेच जाऊ द्यायचे नाही. घरातल्या कामांवरुन तिची सासू तिला विनाकारण त्रास द्यायची. असे तिने पोलिसांना सांगितले आहे.