उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल; इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रेड्डी यांच्यासोबत सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा नेते रामगोपाल यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षांचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुदर्शन रेड्डी यांनी चार सेटमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या सेटमध्ये 20 प्रस्तावक आणि 20 समर्थक होते. बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक आणि महान नेत्यांना आदरांजली वाहिली. इंडिया आघाडीने दक्षिण भारतातील उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक दक्षिण विरुद्ध दक्षिण अशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्स वर नामांकनाबाबतची माहिती दिली आहे.