
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नेमकी कोणत्या मुद्दावर झाली, हे स्पष्ट केले. मुंबई शहरातील वाढती रहदारी, वाहतूक कोंडी आणि विकासाच्या नावाखाली वाढणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच विकासाला विरोध नसून बेशिस्त आणि मनमानी पद्धतीने होणारा विकास आणि त्यामुळे वाढणाऱ्या अडचणी याला विरोध असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच कबुतरखान्याच्या वादावरही त्यांनी परखडपणे मत व्यक्त केले.
तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाचे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. तसेच तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी तो विषय पेरला, पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला समजते कशाला रिस्पॉन्स द्यायचा आणि कशाला नाही. त्यामुळे आम्ही रिस्पॉन्स दिला नाही. ते विषय भरकटवतात, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कधी हत्ती कधी कबूतर असे विषय ते सुरू करतात. त्यामुळे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होते. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. कबूतर हत्तींच्या वादात राज्य सरकारचा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या राजकीय विषयावर आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. माणसांचा जीव, आरोग्य हे कबुतरापेक्षा महत्त्वाचे आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.