
पती-पत्नी विवाहबंधनात अडकले असताना पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करू शकत नाहीत. लग्न म्हणजे पती-पत्नीने एकत्र नांदणे. त्यामुळे जोडीदाराशिवाय पूर्णपणे स्वतंत्र असल्याचा दावा पती किंवा पत्नी कोणीही करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात दिला. जे जोडीदार विवाहानंतर एकमेकांवर विसंबून राहण्यास तसेच एकत्र नांदण्यास तयार नसतात, त्यांनी विवाहबंधनात अडकूच नये, असा इशारा न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने दिला आहे.
विवाह म्हणजे दोन आत्म्यांचे, दोन व्यक्तींचे एकत्र येणे. कोणताही पती किंवा पत्नी मला माझ्या जोडीदारापासून पूर्णपणे स्वतंत्र राहायचे आहे, असे म्हणू शकत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती नागरत्न यांनी सुनावणीदरम्यान केली. तसेच खंडपीठाने मुलांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. जर पती-पत्नी एकत्र आले तर ते मुलांसाठी चांगले होईल. मुलं लहान आहेत. त्यांचा काय दोष? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
पती-पत्नी दोघेही सिंगापूरमध्ये नोकरी करत होते. परंतु पत्नी मुलांसह सिंगापूरला पतीकडे परतण्यास नकार देत आहे. पत्नीने आरोप केला की पतीच्या वागण्यामुळे तिला सिंगापूरला परतणे कठीण झाले आहे. ती कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय मुलांचे संगोपन करत आहे.न्यायालयाने पतीला पत्नी आणि मुलांसाठी पाच लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले.