
हैदराबादहून मित्रांसोबत फिरायला आलेला तरूण सिंहगडावरील तानाजी कड्यावरून दरीत कोसळला. गौतम गायकवाड असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गिर्यारोहक गौतमचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.
हैदराबाद येथील काही तरुणांचा ग्रुप सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गौतम हा तरुण मित्रांना सांगून लघुशंकेसाठी गेला. बराच वेळ झाला तरी तो परतलाच नाही. मित्रांनी गौतमचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही. जवळच हवा पॉईंटशेजारी त्याची चप्पल सापडली.
सिंहगड भागात मुसळधार पाऊस आहे. यामुळे जनिमीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असावा असा अंदाज त्याच्या मित्रांनी व्यक्त केला. यावरून प्रशासनाने खोल दरीत गौतमचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत दरीत त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली आणि गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून अद्याप शोध सुरूच आहे.