ऐकावं ते नवलच! 30 रुपये परत करण्यासाठी गुजरात सरकारचा 44 रुपये खर्च

गुजरातच्या अहमदाबाद येथे एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने माहिती अधिकाराच्या अर्जासाठी सरकार दरबारी 30 रुपये फी मोजली. परंतु 30 रुपयांच्या नोटा खराब आहेत. या चालणार नाही, असे सांगत गुजरात सरकारने हे पैसे परत करण्यासाठी यावर 44 रुपये खर्च केले. कालुपूर येथील रहिवासी पंकज भट्ट यांनी एका प्रकरणाची माहिती हवी यासाठी माहिती अधिकारांतर्गत एक अर्ज दाखल केला.

या अर्जासाठी सरकार दरबारी 20 रुपये आणि एक 10 रुपयांची नोट दिली होती. परंतु ज्यांनी अर्जासाठी पैसे घेतले त्या माहिती अधिकाऱ्यांनी नोटा तपासल्यानंतर या नोटा चांगल्या नाहीत, असे सांगत नोटा परत करण्याचा निर्णय घेतला आणि पोस्टाद्वारे या नोटा पाठवल्या. यासाठी 20 रुपयांचे दोन आणि 4 रुपयाचे दोन तिकीट लावले. म्हणजेच यावर 44 रुपये खर्च करण्यात आले. गुजरात सरकारचा भोंगळ कारभार म्हणजे काय हे मला दिसले. 30 रुपयांच्या नोटांसाठी सरकारने 44 रुपये खर्च केले, हे का केले मला समजले नाही. सरकार छोट्या छोट्या कामासाठी वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवते असे मला वाटते, असे भट्ट यांनी म्हटले आहे.