मिग-21 फायटर जेटचे 26 सप्टेंबरला अखेरचे उड्डाण, 62 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अखेर निवृत्त होणार

हिंदुस्थानी वायुदलातील मिग-21 गेल्या 62 वर्षांपासून आसमंत गाजवत आहे. अनेक युद्धात आणि लढाईत सहभागी असलेले मिग-21 फायटर जेट अखेर सेवेतून निवृत्त होत आहे. पुढील महिन्यात 26 सप्टेंबरला मिग-21 फायटर जेट अखेरचे उड्डाण घेणार आहे. जबरदस्त वेग आणि हलक्या डिझाईनमुळे हे जेट पॉवरफुल बनले आहे, परंतु जुनी टेक्नोलॉजी आणि वारंवार होणाऱ्या दुर्घटनेमुळे हे जेट आता सेवेतून निवृत्त होत आहे. चंदिगडच्या नाल एअरबेस येथून बिकानेर, राजस्थान येथे 26 सप्टेंबर 2025 रोजी अखेरचे उड्डाण करणार आहे.

नाल एअरबेसवर मिग-21 ची तपासणी होईल. जेटचा जो भाग उपयोगी असेल त्याला बाजूला काढले जाईल. जो भाग कामाचा नसेल त्याला स्क्रॅपमध्ये दिले जाईल. उपयोगी असलेला भाग इंजिनीअरिंग कॉलेजला प्रशिक्षणासाठी दिला जाईल. आतापर्यंत निवृत्त झालेल्या अनेक मिग-21 जेटला प्रदर्शनसाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये चंदिगडमधील हिंदुस्थानी वायुसेनेचे हेरिटेज म्युझियम, दिल्लीतील आयएएफ म्युझियम आणि पॉलम एअर फोर्स स्टेशनबाहेर, कोलकातामधील निक्को पार्क, ओडिशातील बिजू पटनायक एअरोनॉटिक्स म्युझियम, एचएएल सुनाबेडा, दिल्लीत राष्ट्रपती भवन म्युझियम या ठिकाणी ठेवले आहे.

  • मिग-21 ला फ्लाइंग कॉफिन असेही म्हटले जाते. 1963 साली हिंदुस्थानी नौदलात हे जेट सहभागी झाले होते. हे मूळचे सोव्हिएतचे फायटर जेट आहे. या जेटने 1965, 1971 आणि 1999 च्या कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
  • मिग-21 पायलटसाठी अनेक मार्ग खुले आहेत. वायुसेनेत पायलटचे तीन प्रकार असतात. यामध्ये फायटर पायलट, ट्रान्सपोर्ट पायलट आणि हेलिकॉप्टर पायलट अशा तीन पायलटचा यात समावेश आहे. मिग-21 निवृत्त झाल्यानंतर पायलट यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.
  • मिग-21 ला वायुसेना संग्राहलय, युद्ध स्मारक किंवा मोठ्या विद्यापीठ आणि सरकारी इमारतीत प्रदर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे.