
<<< श्रीप्रसाद मालाडकर >>>
पं. चंद्रकांत लिमये यांचे वडील गणेश दत्तात्रय लिमये हे कवी होते तर आई गृहिणी होती. मात्र संगीतकार बाळ माटे यांच्याकडे संवादिनी वादन शिकून त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. संगीताचा बहुमोल वारसा आई-वडिलांद्वारे चंद्रकांत यांना मिळाला. आईनी लय, वडिलांनी स्वर दिला. पंडित वसंतराव देशपांडे यांच्याकडे त्यांनी सलग बारा वर्षे शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले. वसंतराव राजोपाध्ये, पं. नारायणराव व्यास, पं. गजाननबुवा जोशी, सी. पी. बाबूकाका रेळे, आग्रा घराण्याचे गायक बालकराम जाधव, जयपूर घराण्याचे गायक पंडित रत्नाकर पै हे त्यांचे गुरू आहेत. चंद्रकांत लिमये हे ‘हिंदुस्तान फेरडो’ कंपनीत नोकरी करायचे. एक दिवस ‘नाट्यसंपदा’चे प्रभाकर पणशीकर यांनी भेटायला बोलावले.
‘नाट्यसंपदा’च्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात वसंतराव ‘खाँसाहेब’ भूमिका करत होते. या नाटकातल्या ‘चाँद’ भूमिका त्यांना दिली होती. ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातल्या ‘चाँद’ भूमिकेमुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले. अशा अनेक गोष्टी बुवांकडे शिकायला मिळाल्या. वसंतरावांच्या पश्चात ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये त्यांनी लोकप्रिय केलेल्या ‘खाँसाहेब आफताब हुसेन’ या मुख्य भूमिकेसाठी चंद्रकांत यांची निवड झाली. प्रसिद्धी माध्यमे, सर्वसामान्य रसिक, वसंतराव यांचे चाहते यांनीही त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. पुण्यातल्या एका प्रयोगाला बुवांच्या पत्नी कुटुंबासह आल्या होत्या. तिसऱ्या अंकात ‘तेजोनिधी लोहगोल’ म्हणण्यासाठी चंद्रकांत यांनी प्रवेश केला आणि बुवांच्या पत्नीला अक्षरशः बुवाच रंगमंचावर आले आहेत असे वाटून त्या नाट्यगृहातून डोळे पुसत बाहेर पडल्या, अशी आठवण चंद्रकांत स्वतः सांगतात.
नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्यासाठी, तरुण गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सन 2000 मध्ये ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ संस्थेची स्थापना केली. ‘होरी के रंग’, ‘श्रुतीरंग’ वर्षा के’, ‘शाकुंतल ते कट्यार’, ‘नाट्यरंग’, ‘हवेली संगीत, घराणों की खासियते’ या कार्यक्रमांचा समावेश केला आहे. संगीताची मनापासून अभिरुची असलेल्या, पण आर्थिक परिस्थिती बेताची विद्यार्थ्यांना त्यांनी विनाशुल्क शास्त्रीय संगीत शिकवले आहे. त्यांच्या संगीत अभिनय कला साधनेचा गौरव ‘सूर संसद’चा ‘सूरमणी’ किताब देऊन गौरव केला आहे. शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची ज्येष्ठ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. महाराष्ट्र कलानिकेतन तर्फे ‘महाराष्ट्र वैभव’ पुरस्कार, ठाण्यात सिद्धकला संगीत अकादमी तर्फेही विशेष पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘स्वर रंगराज’ पुरस्कार मिळाले आहेत. मुंबईसह गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, नवी दिल्लीमध्ये सांगीतिक मैफली झाल्या आहेत. लिमये यांनी गायलेल्या मराठी अभंगांचा ‘भक्तीयात्रा’ हा अभंग संग्रह प्रसिद्ध आहे. दिवंगत संगीतकार स्नेहल भाटकर यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. ‘जयध्वनी’ या जोडरागाची, ‘चंद्र मोहिनी’ या स्वतंत्र रागाची निर्मितीही चंद्रकांत लिमये यांनी केली आहे. तसेच ‘देखादेखी’सह अनेक बंदिशी आणि तराणे त्यांनी बांधले आहेत.
नेहरू सेंटरने गायक, अभिनेते सैगल यांच्या आयुष्यावर ‘फिर तेरी राह गुजर याद आयी’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात लिमये यांनी उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब आणि उस्ताद फैयाज खाँसाहेब अशा दोन भूमिका केल्या होत्या. पुण्याच्या संध्या देवरुखकर यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावर लिहिलेले ‘वसंत बहार’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासाठी पं. चंद्रकांत लिमये यांनी ‘तेजोनिधी लोहगोल’ हा विशेष लेख लिहिला आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ या मराठी चित्रपटात लिमये यांनी ‘अंध गवई’ भूमिका साकारली आहे. ‘द फर्म लॅण्ड’ या फ्रेंच चित्रपटात लिमये यांची गाण्याची मैफल दाखविली आहे.
(ज्येष्ठ प्रसिध्दी माध्यम तज्ञ सल्लागार)






























































