
कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करतोय तरी महायुती सरकारला दया येत नाही. सरकार अदानी आणि अंबानींच्या फायलींवर सह्या करते मग शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हाताला लकवा मारलाय का, असा संतप्त सवाल आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राज्यात रोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत, परंतु महायुती सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. गेंडय़ाच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही, तर आंधळे, मुके व बहिरे आहे. भ्रष्टाचारापुढे सरकारला शेतकऱयांचे दुःख दिसत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करू,’ असे निर्लज्जपणे सांगितले जाते, पण ही योग्यवेळ किती शेतकऱयांचा बळी घेतल्यावर येणार आहे, असा सवालही त्यांनी केला.
शेतकऱयांच्या प्रश्नावर सरकारचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला पंटाळून आत्महत्या केली. “कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरीब शेतकऱयांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली’’ असे आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर बनवलेल्या व्हिडीओत सरोदे म्हणाले. ते ऐकून मन सुन्न झाले, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना त्याचे काहीच वाटत नाही, असे सपकाळ म्हणाले. “शेतकऱयांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवशावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबीयांचा विचार करा,’’ असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.