
>> बाळासाहेब लबडे
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे असणारे पुस्तक. या पुस्तकाच्या संशोधनाचे वेगळेपण प्रामुख्याने यामध्ये सापडणाऱया दृष्टिकोन, संदर्भसंपन्नता आणि प्रत्यक्ष पुराव्याधारित दृष्टिकोनामुळे ठळकपणे जाणवते. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिचित्रांचा अभ्यास हा केवळ कलात्मक रसिकतेपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यामागील ऐतिहासिक प्रवास, राजकीय पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा सखोल उलगडा येथे होतो.
प्रथम हे संशोधन ब्रिटिश लायब्ररी, डच संग्रह, सालारजंग म्युझियम, विजापूर दरबारातील लघुचित्रे अशा विविध ठिकाणच्या दुर्मिळ मूळ स्रोतांवर आधारित आहे. त्यामुळे यातील अभ्यास प्रत्यक्ष अवलोकन आणि तुलना यावर आधारलेला असून केवळ दुय्यम संदर्भांवर अवलंबून नाही. विशेष म्हणजे डच भाषेतील मूळ मजकुरांचे मराठी भाषांतर देऊन त्याचा ऐतिहासिक आणि कलात्मक अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न हा अत्यंत महत्त्वाचा शास्त्राrय उपाम आहे. दुसरे म्हणजे हे पुस्तक केवळ ‘छायाचित्र वा चित्र’ म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा मांडत नाही, तर त्या प्रतिमांच्या निर्मितीमागे असलेले राजकीय संदेश, परकीय प्रवाशांचे दृष्टिकोन, दरबारातील कलाशैली आणि शत्रू राष्ट्रांनी केलेल्या विद्रूप नकलांची कारणमीमांसा यांचा उलगडा करते.या ग्रंथात निकोलस विट्सन, कॉलिन मॅकेन्झी, एड्रियन कॅन्टर फिशर यांसारख्या युरोपीय संग्राहकांचा उल्लेख आणि त्यांच्याकडील अल्बममधील वैशिष्टय़ांचा विश्लेषण करून शिवाजी महाराजांची प्रतिमा जागतिक कलासंग्रहात कशी स्थानापन्न झाली याचा मागोवा घेतला आहे.
‘सतरावे-अठरावे शतक’ या काळातील मूळ प्रतिमा, संभाजी महाराजांची लघुव्यक्तिचित्रे, तसेच त्या काळातील राजे-राजपुत्रांच्या प्रतिमांच्या शैलींची तुलना करून संशोधकाने भारतीय उपखंडातील चित्रकलेतील बदलते सौंदर्य दृष्टिकोन आणि सत्ता प्रतिनिधित्व यांचा पट मांडला आहे. या पुस्तकाचे वेगळेपण असे की, ते केवळ शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचा दृश्य प्रवास सांगत नाही, तर त्या प्रतिमांच्या राजकीय, सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भांचा सखोल मागोवा घेते, भाषांतर, संग्रहालयीन अभ्यास आणि प्रत्यक्ष प्रतिमांच्या तुलनात्मक विश्लेषणाच्या आधारे ऐतिहासिक सत्य व कलात्मक उपांती यांचा संगम घडवते.
भास्कर हांडे यांचे संशोधन केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिचित्रावर मर्यादित नाही, तर त्या चित्राचा जागतिक कलासंग्रह, संग्रहालये, संग्राहक आणि ऐतिहासिक स्रोत यांच्यातील प्रवास सखोलपणे उलगडते. त्यांनी युरोपातील (विशेषत हॉलंडमधील) संग्रहालये, लायब्ररी आणि प्राचीन ग्रंथांचा थेट अभ्यास केला. हा दृष्टिकोन भारतात फारच कमी लोकांनी स्वीकारला आहे. त्यांनी विषयाकडे केवळ ऐतिहासिक किंवा राजकीय दृष्टिकोनातून पाहिले नाही, तर तो एक कलात्मक, सांस्कृतिक आणि जागतिक संदर्भात मांडला. चित्रातील बारकावे, कलाशैली, रचना आणि युरोपातील नोंदी यांचा तुलनात्मक अभ्यास करून इतिहासातील चित्र संशोधनाला नवी दिशा दिली.
शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराज यांच्या चित्रावरील संशोधन व प्रथम चित्र संशोधनाचा प्रयत्न हा विषय अधिकच दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज आणि महत्त्वाचा ठरतो. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिचित्रांच्या जागतिक शोधाला कलात्मक, ऐतिहासिक आणि संशोधनात्मक दस्तऐवजीकरण या पुस्तकांनी दिले आहे यादृष्टीने याचे महत्त्व आहे. युरोप-भारत ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांच्या अभ्यासात भर घातली गेली आहे. भास्कर हांडे यांनी हॉलंड व ब्रिटिश लायब्ररीतील प्राचीन ग्रंथ, अल्बम, संग्रहालये आणि संग्राहक यांचा थेट अभ्यास करून चार शतकांपासून अज्ञात असलेल्या चित्रांचा शोध लावला. त्यामुळे छत्रपतींचे सत्य चित्र आज उपलब्ध होऊ शकलेले आहे.
विषयाच्या दुर्मिळतेसोबत त्यांनी चित्रातील कलात्मक वैशिष्टय़े, ऐतिहासिक संदर्भ आणि जागतिक व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा संबंध स्पष्ट केला. हे संशोधन केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता आधुनिक समाजाला सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा संदेश देते. पूर्वसूरी वा. सी. बेंद्रे यांचा अधुरा शोध पूर्ण करत त्यांनी मराठी समाजाला प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित, विश्वसनीय आणि सखोल संशोधन दिले, जे इतिहास, कला आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांना महत्त्वपूर्ण योगदान ठरते.
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन
लेखक : भास्कर हांडे प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पृष्ठे : 142, मूल्य : 499 रुपये
मुखपृष्ठ : भास्कर हांडे