गीताबोध – जपून टाक पाऊल!

>> गुरुनाथ तेंडुलकर

मानवी जीवनातील उत्तुंग यशासाठी आवश्यक असणारी शिकवण भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिली आहे. पण यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करताना वाटेत जी वेडीवाकडी वळणं लागतात, जिथे भलेथोरले खड्डे आहेत, जिथे निसरडय़ा मार्गावरून घसरल्यामुळे अपघात होऊ शकतात अशी अनेक धोकादायक ठिकाणं आणि अडथळे या वाटेवरदेखील आहेत. इंग्रजीत ज्याला ‘डेंजरस अँड अॅक्सिडेट प्रोन झोन’ म्हणतात तशी ही ठिकाणं.

काय केलं की कल्याण होईल हे भगवंतांनी सांगितलं आहेच, पण त्याचबरोबर अकल्याण होऊ नये म्हणून काय करू नये, कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलदेखील भगवंतांनी स्पष्ट शब्दात समज दिली आहे. ते म्हणतात-

ध्यायतो विषयान्पुंस संगस्तेषु उपजायते

संगात संजायते काम कामात् क्रोध अभिजायते ।।62।।

क्रोधात् भवति संमोह संमोहात् स्मृतिविभ्रम ।

स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति ।।63।।

भावार्थ ः सदोदित विषयांचेच चिंतन करणाऱया माणसाला त्या विषयांबद्दल आवड निर्माण होते. त्यातून पुढे त्याला ते विषय सेवन करावेसे वाटतात. विषय सेवनाची इच्छा पूर्ण झाली तर त्याची चटक लागते आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यातून क्रोध निर्माण होतो.

क्रोधामुळे माणूस संमोहित होतो… संमोहित होतो म्हणजेच त्याला विवेक-अविवेकाचं भान राहात नाही. त्या संमोहातून त्याला वस्तुस्थितीचं विस्मरण होतं. त्याची स्मृती नष्ट होते. स्मृतीच्या विस्मरणामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की सगळंच संपलं.

मागच्या लेखातून मी व्यसन म्हणजे काय आणि माणूस व्यसनात कसा गुरफटत जातो यावर भगवतगीतेच्या अनुषंगाने लिहिलं होतं.आज आपण व्यसनात गुरफटलेल्या माणसाचं पुढे पुढे अधपतन कसं होतं हे थोडक्यात जाणून घेऊया.

व्यसन म्हणजे वाईट सवय. ज्या सवयीचे दूरगामी परिणाम वाईटच होतात त्या सगळ्या सवयी व्यसन या शब्दाच्या परिघात सामाविष्ट करता येतात. केवळ दारू, सिगारेट, जुगार आणि बाईच नव्हे तर चमचमीत, चटकदार तरीही आरोग्याला मात्र अपायकारक पदार्थ नियमित खाणं हेदेखील एक व्यसनच. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभर मोबाईल हातात धरणं हेदेखील व्यसनच. व्यसन या कक्षेत येणाऱया सवयींची ही यादी तुम्ही तुम्हाला हवी तेवढी वाढवत न्या. या सगळ्या व्यसनांची एक गंमत असते की व्यसनी माणूस सतत त्या विषयाचा ध्यास घेत असतो आणि त्याला ते विषय सापडतातदेखील.

माणसाला पोटाची भूक भागवणाऱया अन्नापेक्षा अजून काहीतरी वेगळं हवं असतं. त्याला दारू हवी असते. त्याला तंबाखू हवा असतो. त्याला टीव्हीवरचे बारमाही क्रिकेट सामने हवे असतात… टीव्हीवर कौटुंबिक कलह दाखवणाऱया उथळ कथेच्या भडक मालिका हव्या असतात.

पोटाच्या भुकेपेक्षा वेगळी आणि वेळेचा, आरोग्याचा आणि पर्यायाने आयुष्याचा विनाश करणारी भूक म्हणजे व्यसन.

तंबाखू-मावा खाणारे काही लोक माझ्या ओळखीचे आहेत. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊन असताना त्यांनी कुठे कुठे जाऊन तंबाखू, मावा मिळवला याचे किस्से ते मोठय़ा अभिमानाने सांगतात.

कोरोनाच्या काळात ज्यांना मावा-तंबाखू मिळाला नाही अशी माणसं मनोरुग्ण बनली होती. भगवान श्रीकृष्ण श्लोकातून स्पष्ट सांगताहेत, ध्यायते विषयान् पुंसा संग तेषु उपजायते।

सतत त्याच त्याच विषय विकाराचं ध्यान केलं, चिंतन केलं की त्या विकारवासनेची आवड उत्पन्न होते. अलीकडे इन्स्टाग्रामवर नको नको ते उघडे-नागडे व्हिडीओ रील्स दाखवल्या जातात. अनेक तरुण मुलं-मुली या रील्सच्या व्यसनाला बळी पडली आहेत. जवळजवळ पोर्न म्हणता येईल अशा प्रकारचे अश्लील आणि बिबत्स रील्स बघून त्या विषयाबद्दल मनात सतत कामुक आणि उत्तेजक विचार येतात.

पुढे भगवान सांगतात त्याप्रमाणे, संगात संजायते काम कामात् क्रोध अभिजायते ।

त्या विषयांची आवड निर्माण झाली की, त्या पूर्ण करण्याची इच्छा मनात निर्माण होते. त्यानंतर त्या इच्छा, या कामना, या वासना पूर्ण करण्यासाठी माणसं वाट्टेल त्या थराला जातात. मोबाईलचं व्यसन लागलेल्या एका शाळकरी मुलाने आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिचा गळा दाबून तिला मारले आणि तिचं प्रेत तसंच टाकून तो मोबाईलवर रील्स बघत बसल्याची बातमी मी वाचली होती. दारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून बायकोला मारहाण करणं हा प्रकार तर सर्रास पाहायला मिळतो. व्यसनांच्या पूर्ततेसाठी चोऱया करणं हा प्रकार तर सगळ्यांनाचा ठाऊक आहे.

कामना म्हणजे तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही किंवा इच्छापूर्तीच्या मार्गात अडथळा आला की माणसाच्या मनात संताप निर्माण होतो. क्रोधाची आग भडकते. मनाची शांतता पार ढळते. खळबळ माजते.

त्या इच्छापूर्तीशिवाय इतर कशातही मन रमत नाही. त्या इच्छापूर्तीच्या आड येणाऱया व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल मनात खदखद सुरू होते.

एकदा का मनात खदखद सुरू झाली की त्यातून माणूस स्वसंमोहित होतो. विनोबांनी गीताईमधे सोप्या शब्दांत समजावलं आहे. विनोबा लिहितात-

विषयांचे करी ध्यान त्यात सो संग लागला

संगातूनि फुटे काम क्रोध कामांत ठेविला

क्रोधांतूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली

स्मृतिलोपें बुद्धि नाश म्हणजे आत्मनाश चि

भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला उन्नतीचा मार्ग दाखवतानाच वाटेतील धोका म्हणून आडव्या येणाऱया या अधपतनाच्या सगळ्या पायऱया नीट समजावून सांगितल्या आहेत.

त्या निसरडय़ा पायऱयांवरून पाय घसरू द्यायचा की पहिल्याच पायरीवरच पाय ठेवायचा नाही, हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न…

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

[email protected]