पाणी, व्यवहार बंद केले, मग पाकिस्तानशी क्रिकेट कशासाठी? भाजप समर्थक सट्टेबाजांसाठी? संजय राऊत कडाडले

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. एका बाजुला तुम्ही म्हणताय की, पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी अडवू. मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसे याचे उत्तर द्यावे लागेल. हा निर्लज्जपणा असून दुसऱ्याचे सरकार असताना हा निर्णय घेतला गेला असता तर मोदी, शहा यांनी संपूर्ण देशभरात आंदोलन उभे केले असते. पण पंतप्रधानांनी शांतपणे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. कशासाठी? भाजप समर्थक, देणगीदार सट्टेबाजांसाठी? असा सवाल राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केला.

शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, हिंदुस्थानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान यांना असे वाटते की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्मालाच आला नाही. त्यांच्या सरकारने काल आशिया चषक क्रिकेट सामने आणि खासकरून पाकिस्तानबरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला. हिंदुस्थानच्या क्रीडा मंत्रालयाने आणि पंतप्रधानांनी यास परवानगी दिली. हा प्रकार धक्कादायक आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढणारा हा निर्णय आहे. याबाबत मी पंतप्रधानांना प्रश्न विचारला की, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची आपल्याला जी खुमखुमी किंवा खाज आहे, त्यासाठी पहलगाममध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना विचारले का? त्यांच्या भावना समजून घेतल्या का? आणि अशी आपली कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहेत?

नरेंद्र मोदी आणि आपले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणतात ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारले आहे, त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचे? अमित शहांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र जय शहा दुबईl हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ऐटीत बसणार. हिंदुस्थानच्या जनतेने पाकिस्तानविरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचे, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार. हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे. आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, असे राऊत म्हणाले. काल आदित्य ठाकरे यांनीही या विषयावर स्पष्ट आणि परखड मत मांडलेले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना, पहलगाममध्ये सांडलेल्या रक्ताचे डाग सुकलेले नसताना, पोरक्या झालेल्या कुटुंबीयांचे अश्रू थांबले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला पंतप्रधानांनी परवानगी देतात यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही. आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करत आहोत, असेही राऊत म्हणाले.

हा विषय आम्ही लावून धरला आहे, कारण आमचे मन जळतेय. आम्ही आक्रोश पाहिला आहे. आम्ही ढोंगी नाही आहोत. आमचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्के आहे, भाजपसारखे ढोंगी नाही. महाराष्ट्रात किंवा देशात असा एखादा सामना झाला असता तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेने कसोशीने प्रयत्न केले असते. महाराष्ट्रात तर शक्यच नव्हते. दिल्लीत जरी झाला असता, इतरत्र झाला असता तरी जेवढी आमची ताकद आहे ती लावून हा सामना उधळून मोदींना चपराक लगवली असती. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपले नसताना अशा प्रकारे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणे मान्य नाही. पाकिस्तान शरण आला म्हणता ना, मग क्रिकेटमध्ये का शरण जाताय तुम्ही? असा सवालही राऊत यांनी केला.

प्रश्न क्रिकेट हा खेळ नसून हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आहे. हे धर्मयुद्ध असल्याचे मोदी, आणि त्यांचे लोक म्हणतात. मग क्रिकेट कसे खेळता? पाणी बंद केले, व्यापार बंद केला, व्हिसा बंद केला, मेडीकल व्हिसा बंद केला, इकड़ल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून वेचून पाठवले. मक क्रिकेट कशाकरता खेळता. क्रिकेटमधील हा जो व्यापार आहे त्यात कोण आहे? असा सवाल करत राऊत म्हणाले की, पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो. सगळ्यात जास्त सट्टेबाजी मुंबईनंतर गुजरातमधून, राजस्थानमधून होते. त्यांच्यासाठी ही खुली सुट दिली का? म्हणजे राष्ट्रीय भावना आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि सामने खेळवायचे, हा कोणता राष्ट्रवाद? याला मी देशद्रोही म्हणता, असा घणाघात राऊत यांनी केला.

अजून आमचे अश्रूही थांबलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानशी क्रिकेट खेळता? कशासाठी? पहलगाममध्ये आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबियांचा मोदींना सवाल

सट्ट्यांचे आणि ऑनलाईम गॅम्पलिंगचे इतर सुद्धा अनेक प्रकार आहेत, जे कागदावर नाही. ते बहुतांश गुजरातच्या भूमिवरूनच चालतात, काही प्रमाणात राजस्थान, मध्य प्रदेशमधून चालतात. लाखो कोटींची ही उलाढाल असते. हे सगळे लोक भाजपचे समर्थक, मोठ्या प्रमाणात देणगीदार आहेत. त्यांना नंतर संरक्षण दिले जाते. त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत-पाकिस्तान सामना खेळवत आहेत का? भारतीय क्रिकेटला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मला भारतीय क्रिकेटपटूंचे आश्चर्य वाटते. त्यांना काही राष्ट्रीय भावना आहेत की नाही? जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये. पण ते जातील, कारण त्यांच्यावरती शहा, मोदींचा दबाव असू शकतो, असेही राऊत म्हणाले.