जादा परताव्याच्या आमिषाने बारा महिलांना पाच लाखांचा गंडा; सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बचत गटाच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यास सांगून त्यावर दोन टक्के व्याज देतो, असे आमिष दाखवून साताऱ्यातील बारा महिलांना 5 लाख 14 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सारिका संदीप भोसले (रा. मंगळवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. सारिका जाधव (रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

सारिका जाधव यांची सारिका भोसले या महिलेसोबत 2023 मध्ये ओळख झाली. सारिका भोसले यांनी समृद्धी महिला बचत गट असल्याचे सांगून पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार सारिका जाधव यांनी दरमहा 4500 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. ही रक्कम त्या रोख व ऑनलाइन माध्यमातून देत होत्या. मात्र, त्या बदल्यात सारिका भोसले या पासबुक व पैशांची पावती सारिका जाधव यांना देत नव्हत्या. त्यांनी वेळोवेळी पासबुक व पावती मागितली. मात्र, त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. यामुळे सारिका जाधव यांनी एप्रिल 2025 पासून दरमहा 4500 रुपये भरणे बंद केले.

त्यांनी वेळोवेळी संबंधित रक्कम भोसले यांना मागितली. फोनवरून त्या पैसे देते, असे सांगत होत्या. त्यानंतर भोसले यांनी फोन घेणे बंद केले व पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे सारिका जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या प्रमाणेच इतर महिलांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार सर्व महिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली.

फसवणूक झालेल्या महिलांमध्ये माय-लेकी-मैत्रिणी, भावजय असा गोतावळा आहे. यामध्ये सुप्रिया जाधव, सत्वशीला जाधव, मयुरी ताटे, अंजली जाधव, सावली घोरपडे, काजल जाधव, मनीषा जाधव, गितांजली जाधव, भक्ती यादव, कांता घाडगे या महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला दरमहा 200, 500, 1000 रुपये बचत गटासाठी भरत होत्या.