
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
संगीत – नाटय़ – नृत्य – लोककला – शिल्पकला आदी कलेच्या प्रांतातही आधी नमन गणरायालाच केले जाते. सर्वच लोककलांमध्ये ‘गणेशवंदना’ आणि ‘गणेशस्तुती’ यांवर अनेकांनी लालित्यपूर्ण ‘कवने’ लिहिली आहेत. यालाच लोकसाहित्यामध्ये किंवा लोककलेमध्ये ‘गण’ असे म्हणतात. श्री गणरायाच्या रूपाचे, गुणांचे, लीलेचे आणि भावभक्तीचे वर्णन या गणात केले जाते.
गणेश हे विद्येचे, कलेचे, बुद्धीचे आणि मातृपितृ प्रेमाचे दैवत आहे. ते जनमानसात फार लोकप्रिय आहे. घरीदारी कोणतेही शुभकार्य असो, आधी पूजन गणरायाचे. गणेश पूजनाला सर्वाआधी मान. तद्वतच कोणत्याही देवदेवतांच्या दर्शनाला जा, तिथे आधी नमन गणरायाचे. हे प्रारंभीचे पूजन केवळ शुभकार्यापुरतेच मर्यादित नाही किंवा केवळ घरात तसेच मंदिरातही त्याला अग्रपूजेचा मान आहे असे नाही, तर संगीत – नाटय़ – नृत्य – लोककला – शिल्पकला आदी कलेच्या प्रांतातही आधी नमन गणरायालाच केले जाते.
‘ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।
जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा। देवा तुचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु ।
अवधारिजो जी ।।’
या आद्य ओवीने प्रथमत आत्मरूपी गणेशाला वंदन करूनच ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कळसाला नेला. ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’च्या पहिल्याच अध्यायात प्रारंभी श्री गणरायाचे वर्णन केले आहे. हे सर्वांचे मूळ असणाऱया व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱया ॐकारा, तुला नमस्कार असो. स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणाऱया आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो! सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस. म्हणे निवृत्तीदासू म्हणजेच निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।। 3 ।।’
संपूर्ण वेद हीच त्याची (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे
‘स्मृति तेचि अवयव । देखा आंगिक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।। 4 ।।
आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. मन्वादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत.
‘अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ।। 5।।
अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्त्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत.
‘पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ।। 6 ।।’
उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत.
‘देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ।। 7 ।।’
पहा, कौतुकाने काव्य-नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱया असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात.
हीच ज्ञानेश्वर माऊलींच्या गणेशस्तुतीची प्रेरणा समस्त लोककलावंतांनी घेतली आहे. सर्वच लोककलांमध्ये ‘गणेशवंदना’ आणि ‘गणेशस्तुती’ यांवर अनेकांनी लालित्यपूर्ण ‘कवने’ लिहिली आहेत. यालाच लोकसाहित्यामध्ये किंवा लोककलेमध्ये ‘गण’ असे म्हणतात. कार्पामाच्या सुरुवातीला हा गण बहारदारपणे सादर केला जातो आणि या गणानंतरच कार्पामात खऱया अर्थाने रंग भरला जातो. या गणाची एक प्रभावी व दमदार परंपराच या लोककला प्रकारात निर्माण झाली आहे. श्री गणरायाच्या रूपाचे, गुणांचे, लीलेचे आणि भावभक्तीचे वर्णन या गणात केले जाते. हा सारा शब्दसांभार गणरायाच्या स्तुतीने शब्दबद्ध करण्यात मराठी साहित्य प्रांगणातील अनेक कवींनी आणि शाहीरांनी स्वतला धन्य करून घेतले आहे. या कवींचे आणि शाहीरांचे अनेक गण रसिकांच्या ओठांवर आजही आपसूकच येतात.
शाहीर सगनभाऊ जेजुरीकर पुढील गणात लिहितात.
रंगरूप ज्ञानकळा, अगाध ही तुझी लीला
सरळ सोंड पातुंड हे गजानना
सभेमध्ये यावे तुम्ही
पायी घुंगरू वाजताती, सभेमध्ये नाचताती
द्यावी मला ज्ञानमती, कुलभूषणा
रिद्धी-सिद्धी तुझं हाती, पाव मला गणपती
सगनभाऊ स्मरती चित्ती सभारंगणा
पारंपरिक लोककलावंतांनी गणेशाला रंगभूमीची देवता म्हणून आद्य पूजेचा मान दिलेला आहे. गणाचे प्रयोजन जरी गणेशाची आराधना म्हणून असली तरी गणरायाच्या गुणांचे वर्णन करता करता समोरच्या रसिक प्रेक्षकांनासुद्धा काही बोध देता येईल याचे भान शाहीरांनी मुद्दाम ठेवले आहे. लोकरंजन करता करता लोकशिक्षण देण्याचं फार मोठं कार्य या लोककलावंतांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेले आहे. त्याची सुरुवातच या गणातून होते.
गणपती हा गण आहे, रंगभूमीचे ते दैवतं आहे, त्याचे दर्शन मनाला मोहवून टाकते अशा आशयाची शाहीर गंगू हैबती यांची ही दुर्मिळ रचना.
‘रंगराज आज…महाराज गणपती…एकदंत पातुंड…
हास्य वदन…सरळ शुंड…फरशांकुश कटी प्रचंड…
दूर्वांकुर गंडस्थळी, दिव्य मिरविती ।।1।।
नमू नाथ आदिवीरा, शूलपाणी खड्गधारा जननमरण नाही जरा, शरण त्या मी शंकरा
भावें निश्चिती।।2।।
टाळ वीणा मोरचंग, वाजतात बिन मृदुंग
गर्जती कवी जंग… सभारंगणात गंगू हैबती ।।3।।
संतसाहित्यातील रचनांनी लोककलेला आणि लोकसाहित्याला नेहमीच आधार दिला आहे. अनेक संतांच्या रचना लोकसाहित्य या संज्ञेमध्ये पुरेपूर बसणाऱ्या अशा आहेत. समाज जागृतीचे एक उत्तम माध्यम म्हणून समाजात लोकप्रिय झालेल्या आणि समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या लोककलांसाठी उपयुक्त होतील अशाच रचना संतांनी केलेल्या आहेत आणि त्यातूनच लोकसाहित्य बहरले आहे. भागवत संप्रदायातील अनेक संतांच्या विविध अभंगांतून व भारुडातूंन विविध आविष्कार निर्माण झालेले असून संतांनी लिहिलेल्या अभंग, ओव्या, भारूड, गवळणी, गोंधळ यातून लोकसाहित्याचे दर्शन होते.
लोकसाहित्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे भाव ठायी ठायी दिसून येतात. गणरायाची आराधना आणि स्तुती करताना शाहीर पठ्ठे बापुराव आपल्या गणात म्हणतात…
‘लवकर यावे सिद्धगणेशा…
आतमधी कीर्तन वरून तमाशा…
माझा भरवसा तुम्हांवर खासा…
विद्या पळविशी दाही दिशा…
झेंडा मिरविशी आकाश पाताळी…
वैरी करिती खाली मिश्या…
विद्या चतुरदश उदर भरण्यासाठी…
परब्रह्म विद्येची वेळी नशा…
महाकालालाही मारील दंडा…
भीती नाही तया दाही दिशा…’
गणरायाच्या भक्तीत देहभान हरपून अनेक शाहीरांनी वेगवेगळ्या ढंगात प्रतिभेच्या पंखांवर स्वार होऊन गण लिहिले आहेत. शाहीर पठ्ठे बापुरावांचा अत्यंत गाजलेला व आजही रंगभूमीवर तितक्याच तन्मयतेने सादर होणारा हा गण रसिक प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेऊन मिरवला आहे…
आधी गणाला रणी आणिला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
धन्य शारदा, ब्रह्म कन्यका, घेऊन येईल रुद्रवीणा
साही शास्त्रांचा, मंत्र अस्त्रांचा
दावील यंत्र खाणाखुणा
सद्गुरू माझे जगद्गुरू, मेरूवरचा धुरू आणा
लोककलेचा मुख्य उद्देशच लोकरंजनातून लोकशिक्षण हा आहे आणि समस्त मराठी संतांनी याच उद्देशाने आपल्या रचना केलेल्या आहेत. म्हणूनच लोककलेचा चेहरा जरी लोकरंजनाचा असला तरी आत्मा लोकशिक्षणाचा आहे.
[email protected]
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)