
>> विजय जोशी
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील तीन लक्ष हेक्टर क्षेत्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मुखेड तालुक्यातील सहा गावे उद्ध्वस्त झाली आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त व शेतकर्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हडकोच्या मैदानावर भाजपा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत गौतमी पाटीलचा थरार व लावणी नृत्य सादर झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यात १७,१८,१९ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीने पुराचा हाहाकार उडाला. जिल्ह्यातील तीन लक्ष हेक्टरवरील शेती उदध्वस्त झाली असताना तसेच मुखेड तालुक्यातील सहा गावात लेंडी धरणाचे पाणी शिरल्याने शेकडो घरे उदध्वस्त झाली. पुराने हाहाकार उडाला. त्यांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा तसेच अन्य राजकीय मंडळी, स्वयंसेवी संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हसनाळ हे गाव पूर्णतः उदध्वस्त झाले असून, सर्वत्र हाहाकार उडाला आहे. असे असताना नांदेडच्या हडको भागात एका मैदानावर काल रात्री दहीहंडीच्या निमित्ताने लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील व त्यांच्या सहकार्यांचे नृत्य सादर करण्यात आले. यामुळे सर्वच राजकीय क्षेत्रात तसेच सर्वसामान्यात संतापाची लाट पसरली आहे.
जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हताश झालेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पूरग्रस्तांचे अश्रू थांबण्यास नाव घेत नाही. शेती पूर्णतः उदध्वस्त झाली आहे. सोयाबीर, कापूस, मूग, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. मात्र भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह अनेकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असून, सोशल मिडीयावर या कार्यक्रमाबाबत प्रचंड टिका होत आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते फारुख अहेमद यांनी सत्ताधारी मंडळींनी अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणे हे संतापजनक असून, जिल्ह्याला कोणीही वाली राहिला नाही. अनेक राजकीय पुढारी जिल्ह्यात पूराचा हाहाकार उडाला असताना लंडनमध्ये होते.
वास्तविक भयानक परिस्थिती निर्माण झालेली असताना व शेतकरी संकटात असताना दहा तासात त्यांना नांदेड गाठता आले असते. ते तर झालेच नाही, उलट दहीहंडीचे निमित्त करुन भाजपाच्या पुढाकाराने एका युवा ग्रुपने प्रसिध्द नृत्यांगणा गौतमी पाटील यांचे नृत्य ठेवले. वेगवेगळ्या लावण्या व अनेक दिलखेचक नृत्य सादर करुन त्याठिकाणी पूरग्रस्तांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. सत्ताधार्यांची हि कृती कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे शहर अध्यक्ष अमर राजूरकर, आमदार श्रीजया चव्हाण व अनेक पदाधिकारी या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि नृत्याचा आनंद घेतला. हे कितपत योग्य असल्याचा सवाल त्यांनी केला आहे. दुसरीकडे महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनीही याबद्दल संताप व्यक्त करुन सत्ताधारी मंडळींची हि कृती निषेधार्ह आहे, एकीकडे शेतकरी, गावकरी पुराच्या हाहाकारात दुःखात असताना व सबंध जिल्ह्यावर अतिवृष्टीचे संकट घोंगावत असताना भाजपाच्या पुढाकाराने झालेला नृत्यांगणाचा कार्यक्रम चीड आणणारा असल्याचे मत व्यक्त केले.