
मुंबई पोलीस आयुक्तालयातून आता पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल्स हद्दपार होणार आहेत. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलिसांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे याकरिता आरो प्लांट सुरू केला आहे. तेथून काचेच्या बाटलीत शुद्ध पाणी भरून मिळणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीने प्लॅस्टिकचा वापर किती धोकादायक आहे, याबाबत वेळोवेळी विविध माध्यमांतून स्पष्ट झाले आहे. शिवाय बाटलीबंद पाणी किती दिवसांचे असते तसेच ते पाणी किती शुद्ध असते याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त भारती यांनी यांची गंभीर दखल घेतली आहे. अशुद्ध पाण्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आयुक्तालयात सर्वांना शुद्ध पाणीच प्यायला मिळावे याकरिता आयुक्त भारती यांनी आरो प्लांट सुरू केला आहे. तेथून शुद्ध पाणी काचेच्या बाटल्यांमधून आयुक्तालयातील सर्व कार्यालयांमध्ये देण्यात येत आहे. शुद्ध पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची समस्या रोखता येईल, शिवाय या माध्यमातून प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर टाळता येईल. अशा प्रकारे पोलीस आयुक्तालय लवकरच प्लॅस्टिक बॉटलमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.