चाकरमानी नाही, कोकणवासीय म्हणा! अजित पवार यांचे निर्देश

कोकणातून मुंबई, पुणे आदी शहरांत कामासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांना चाकरमानी नाही, तर कोकणवासीय म्हणण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात सरकारी परिपत्रक जारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

‘चाकरमानी’ या शब्दाला अनेक वर्षांपासून कोकणातील संघटनांकडून विरोध होत होता. ‘चाकरमानी’ संबोधनामुळे कोकणातील नागरिकांचा अपमान करतो, अशी भावना व्यक्त केली होती. ‘चाकर’ म्हणजे ‘नोकर’ किंवा ‘सेवक’ आणि ‘मानी’ म्हणजे मानणारा असा अर्थ होतो. हे लक्षात घेता यापुढे फक्त ‘कोकणवासीय’ संबोधण्याचे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

‘कोकणवासीय हे केवळ कामगार नसून ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. ‘चाकरमानी’ हा शब्द त्यांची सांस्कृतिक ओळख आणि स्वाभिमान कमी करतो,’ असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी यापुढे सरकारी दस्तऐवज, पत्रके, जाहिराती आणि अधिकाऱ्यांच्या भाषणात ‘चाकरमानी’ हा शब्द टाळण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.