
मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱया एका लक्झरी बसला रविवारी मध्यरात्री 2ः10 च्या सुमारास कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱया पुलावर अचानक आग लागली. क्षणातच आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली, असे प्रवाशांनी सांगितले.
आगीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत (एमएच 02 एफजी 2121) क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे सामानदेखील आगीत भस्मसात झाले.
वैभव मांगले यांनीही मांडले भीषण वास्तव
मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी सोशल मीडियात पोस्ट करून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांची पोलखोल केली. ‘माणगाव, संगमेश्वर येथे महामार्गाची भीषण अवस्था आहे. तो रस्ता कधी होईल किंवा होईल की नाही हेही सांगता येत नाही. आजूबाजूला घनदाट वस्ती आहे. त्यातून ते कसा मार्ग काढणार… कुणास ठाऊक,’ अशा शब्दांत मांगले यांनी महामार्गाच्या दुर्दशेवर भाष्य केले. मी गेली 17 वर्षे रस्ता चांगला होण्याची वाट पाहतोय,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आणि गणेशभक्तांना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले.