
बिहारमध्ये सुरू असलेली एसआयआर मोहीम हा संस्थात्मक चोरीचा प्रकार आहे. लाखो मतदारांची नावे कापली गेली आहेत. त्याविषयी आम्ही तक्रार करतोय, पण भाजप काहीच बोलत नाही. त्यांना या प्रक्रियेवर आक्षेप का नाही, असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ‘निवडणूक आयोग, त्याचे आयुक्त आणि भाजप अशी पार्टनरशीप आहे. त्यामुळेच भाजप गप्प आहे,’ असा आरोप राहुल यांनी पूर्णिया येथील पत्रकार परिषदेत केला.
मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली यात्रा आज पूर्णिया जिल्ह्यात पोहोचली. ‘निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने आहे हे आता देशाला माहीत झाले आहे.
निवडणुकीतील घोटाळ्याबद्दल मी जे बोललो, नेमकं तेच अनुराग ठाकूर बोलले, पण त्यांच्याकडे कोणी प्रतिज्ञापत्र मागितले नाही. आयोगाचे वर्तन आणि कार्यपद्धती बदलावी हाच आमच्या यात्रेचा उद्देश आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
तरुणाचा राहुल यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न
पूर्णिया येथे यात्रेदरम्यान राहुल गांधी हे बुलेट चालवत पुढे निघाले होते. त्याचवेळी सुरक्षेचे कडे तोडून एक तरुण यात्रेच्या मार्गात घुसला आणि राहुल यांना मिठी मारू लागला. त्यांच्या या कृतीमुळे राहुल गांधी हे चालू गाडीवरून पडण्याची शक्यता होती. लगेचच सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला बाजूला केले व यात्रा पुढे निघून गेली.
राहुल गांधी म्हणाले, वधू संशोधन सुरू आहे!
याच पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांना चिराग पासवान यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तेजस्वी यांनी चिराग पासवान यांना लग्न करण्याचा खोचक सल्ला दिला. बाजूला बसलेल्या राहुल यांनी लगेचच तेजस्वी यांच्या मांडीवर थाप मारली आणि मलाही हा सल्ला लागू पडतो, असे बोलले. त्यावर माझे पप्पा (लालू यादव) कधीपासून तुम्हाला सांगतायत. तेजस्वी यांनी ही आठवण देताच, बोलणी सुरू आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.