
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने क्रिकेटच्या जगात एक नवीन सुरुवात केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, तो आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत उतरला आहे. अलिकडेच त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग SA20 च्या आगामी हंगामासाठी गांगुलीची प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गांगुलीच्या कारकिर्दीत हे पहिल्यांदाच आहे की तो, एखाद्या व्यावसायिक फ्रँचायझी संघासोबत पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. प्रिटोरिया कॅपिटल्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोठ्या निर्णयाची घोषणा केली आणि त्याला ‘कोलकात्याचा राजकुमार’ असे संबोधून संघात स्वागत केले. त्यांनी लिहिले की, “आमच्या संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून सौरव गांगुलीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.”
यापूर्वी इंग्लंडचे माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांनी प्रिटोरिया कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली. ट्रॉट यांनी पद सोडल्यानंतर एक दिवसानंतर गांगुलीची नियुक्ती झाली आहे. गेल्या हंगामात ट्रॉटच्या प्रशिक्षकपदाच्या काळात संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. अशा परिस्थितीत, आता गांगुलीवर आशा आहेत की तो संघाला एक नवीन दिशा देईल.
सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्दही खूप चमकदार राहिली आहे. त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात त्यांनी हिंदुस्थानी संघाला एक नवीन ओळख दिली. बीसीसीआय अध्यक्ष असतानाही त्यांनी अनेक मोठे निर्णय घेऊन क्रिकेटला नवीन उंचीवर नेले. अलिकडेच ते आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकाची भूमिका बजावत होते. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नवीन खेळी विशेष महत्त्वाची आहे.
एसए २० चा पुढील हंगाम २६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत खेळला जाईल. प्रिटोरिया कॅपिटल्स पहिल्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु २०२५ मध्ये त्यांची कामगिरी खूपच खराब होती. गांगुलीच्या समोर आता सर्वात मोठे आव्हान संघाला पुन्हा जेतेपदाच्या शर्यतीत आणण्याचे असेल.