
कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या बाथरुममध्ये अडकल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. मौजे कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथील एका घराच्या बाथरूममध्ये सोमवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्या अडकला. बिबट्याला पाहून नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्या आणि कुत्र्याची सुरक्षित सुटका केली.
कुंभारखणी खुर्द येथील रहिवासी ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये एका बिबट्याचा पाठलाग करत असताना कुत्रा आणि बिबट्या दोघेही आत अडकले. ही बाब लक्षात येताच, कुंभारखणी खुर्दचे पोलीस पाटील रवींद्र महाडिक यांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने बाथरूमच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला लाकडी फळ्या लावून तो भाग बंद केला आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
वन विभागाच्या टीमच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर, बाथरूममध्ये अडकलेला कुत्राही सुखरूप बाहेर आला. वन विभागाने पकडलेल्या बिबट्याची तपासणी पशुधन विकास अधिकारी श्रेणी 1 सूर्यकांत बेलुरे यांनी केली. बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे 8 ते 9 वर्षे आहे. तपासणीनंतर तो पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.