
हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेने लादलेला 50 टक्के टॅरिफ बुधवारपासून (27 ऑगस्ट) लागू होणार आहे. कपडय़ांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत अनेक वस्तूंवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी उद्योग वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या टॅक्स टेररिझमला मोदी सरकारने कुठलेही ठोस प्रत्युत्तर न दिल्याने आता देवावरच विसंबून राहण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे.
अमेरिका ही हिंदुस्थानी निर्यातदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. हिंदुस्थानातून निर्यात होणाऱया एकूण उत्पादनांपैकी 20 टक्के निर्यात एकटय़ा अमेरिकेत होते. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. व्हिएतनाम, बांगलादेश व मेक्सिकोच्या तुलनेत आपली उत्पादने अमेरिकेत महाग होणार आहेत.
दिल्लीत आज उच्चस्तरीय बैठक
टॅरिफच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. हिंदुस्थानी निर्यातदारांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन त्यावरील उपायांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
कितीही दबाव आला तरी मार्ग काढू – मोदी
सर्वच देश सध्या आर्थिक स्वार्थाचे राजकारण करत आहेत. हिंदुस्थानवरही आर्थिक दबाव टाकला जात आहे, पण कितीही दबाव आला तरी आम्ही डगमगणार नाही. त्यातून मार्ग काढू. देशाची ताकद वाढवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे स्पष्ट केले. छोटे उद्योजक, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करू, असे ते म्हणाले.
- कापड आणि ड्रेसेस – हिंदुस्थानकडे येणाऱ्या ऑर्डर्स आशियातील अन्य देशांकडे जाणार.
- हिरे आणि दागिने – आर्थिक वर्ष 2024 मध्ये हिंदुस्थानने 9.2 अब्ज डॉलर्सचे हिरे व दागदागिन्यांची निर्यात केली. टॅरिफच्या घोषणेनंतर ही निर्यात बंद झाली आहे. परिणामी या उद्योगातील रोजगारावर परिणाम होत आहे.
- ऑटो पार्ट्स, फार्मा व इलेक्ट्रॉनिक्स – टॅरिफमुळे किमती वाढल्याने या उद्योगातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम.
- सीफूड्स – मागील आर्थिक वर्षात हिंदुस्थानने 86.5 अब्ज डॉलर्स किमतीची कोळंबी निर्यात केली होती. हा आकडा एकूण निर्यातीच्या 20 टक्के होता. टॅरिफ लागू झाल्यानंतर त्यात घट होण्याची भीती.
- ग्राहकोपयोगी वस्तू, चामडे – विश्लेषकांच्या माहितीनुसार, टॅरिफचे नवे दर दीर्घकाळ सुरू राहिल्यास अमेरिकेच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या अभियांत्रिकी वस्तू, चामडे आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांना फटका बसणार आहे.