
सार्वजनिक बांधकाम खात्यातील झोलझपाट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुरबाड व शहापूर तालुक्यात २०२४ मध्ये तब्बल १६ कोटी ५५ लाखांची कामे लाडक्या कंत्राटदारांना देऊन अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिसे भरले आहेत. धक्कादायक म्हणजे वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध केल्याचा खोटा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करून कोट्यवधींच्या कंत्राटांची खिरापत वाटण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून याची पोलखोल एका सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. त्याने टाकलेल्या या आरोपाच्या बॉम्ब गोळ्याने बांधकाम खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली आहे.
बांधकाम विभागातील ठाणे कार्यकारी अभियंता यांनी मुरबाड व शहापूर तालुक्यातील जोडरस्ते, संरक्षक भिंत, रुग्णालयाचे प्रवेशद्वार, पार्किंग शेड उभारण्यासाठी १६ कोटी ५५ लाख १९ हजार रुपयांची कामे मंजूर केली होती. मात्र नियमाने ही कामे कंत्राटदारांना देण्यापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करणे गरजेचे होते, परंतु अशी कोणतीही प्रक्रिया न करता मर्जीतील ठेकेदारांना ही कामे वाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणीदेखील देशमुख यांनी केली आहे.
जाहिराती प्रसिद्ध झाल्याच नाहीत
बांधकाम खात्याने १६ कोटींच्या कामाच्या निविदांच्या जाहिराती काही वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांना दिली आहे. प्रत्यक्षात ३०-९-२०२४ च्या वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केले नसतानाही निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत. ज्या वृत्तपत्रात या जाहिराती प्रसिद्धीसाठी दिल्या त्या वृत्तपत्रांना दिलेल्या पेमेंटच्या नोंदी मिळाव्यात अशी मागणी देशमुख यांनी केली. परंतु ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
अधिकारीच ठेकेदारीत पार्टनर
पूर्वी एखादे काम मंजूर करताना अधिकारी टक्केवारी घ्यायचे. मात्र आता अधिकारी कंत्राटदाराच्या खांद्यावर कामाची बंदूक ठेवून पार्टनरशिप करत आहे. मुरबाड, शहापुरातही बांधकाम खात्यातील सरकारीबाबूंनी ही क्लृप्ती वापरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच पारदर्शकपणे निविदा प्रसिद्ध न करता लाडक्या कंत्राटदारांना १६ कोटींची कामे दिल्याचे दिनेश देशमुख यांनी सांगितले.