
अमेरिकेने हिंदुस्थानी आयातीवर लादलेला 50 टक्के टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने तशी अधिसूचनाच आज काढली. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची पळापळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी जपान दौऱ्यावर जात असून त्यानंतर ते चीनला जाणार आहेत. या दौऱयात ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ टेररिझम’वर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन गृह मंत्रालयाने आज टॅरिफच्या अंमलबजावणीची अधिसूचना काढली. त्यानुसार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.31 वाजता किंवा त्यानंतर हिंदुस्थानी गोदामाबाहेर पडणाऱया वस्तूवर नव्या दराने टॅरिफ आकारला जाईल. या वेळेआधी गोदामाबाहेर पडलेल्या किंवा प्रवासात असलेल्या वस्तूंना यातून वगळले जाईल. मात्र त्याची रीतसर सूचना आयातदारांनी देणे गरजेचे आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
शेअर बाजारात हाहाकार
टॅरिफचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून, मंगळवारी मुंबई शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स 849 अंकांची घसरून 80,786 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 255 अंकांनी घसरून 24,712 अंकांवर बंद झाला.
कापूस उत्पादकांना फटका – अनिल देशमुख
या वर्षी राज्यात सुमारे 40 लाख 73 हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होऊनही कापसाची विदेशातून आयात करण्यात येत आहे. यासाठी कापसावरील आयात शुल्क सुध्दा रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे हिंदुस्थानमधून अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात कापूस निर्यात केला जात असताना 50 टक्के टॅरिफचा फटका कापूस निर्यातीवर होणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या टॅरिफ नीतीवर भाष्य केले आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. शेतकरी, छोटे उद्योजक व उत्पादकांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, टॅरिफच्या विषयावर चर्चेसाठी ट्रम्प यांनी मोदींना चार वेळा कॉल केला होता, मात्र मोदींनी त्यांचा फोनच उचलला नाही, असा दावा एका जर्मन वृत्तपत्राने केला आहे.