
गंगोत्री ग्लेशियर संदर्भात नुकताच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय सहयोगींच्या मदतीने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, गेल्या ४० वर्षांत गंगोत्री ग्लेशियर हे सुमारे 10 टक्के वितळले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व डॉ. पारुल विंजे (ग्लॅसी-हायड्रो-क्लायमेट लॅब, आयआयटी इंदूर) यांनी केले. त्यात चार अमेरिकन विद्यापीठे आणि नेपाळमधील आयसीआयएमओडीचे शास्त्रज्ञ देखील समाविष्ट होते. हे संशोधन जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये प्रकाशित झाले आहे. यामध्ये गंगोत्री हिमनदी प्रणाली (GGS) चे १९८०-२०२० मधील उपग्रह डेटा आणि वास्तविक डेटा वापरून विश्लेषण करण्यात आले.
अभ्यासातून अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. यांतर्गत असे दिसून आले की, हवामान बदलामुळे हिमालयीन प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी कमी होत आहे. उन्हाळ्यात लवकर बर्फ वितळल्याने प्रवाहाची वेळ बदलली आहे. दीर्घकाळात बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि पावसावरील अवलंब वाढत आहे. मे २०२५ मध्ये द क्रायोस्फीअर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात २०१७-२०२३ दरम्यान गंगोत्री ग्लेशियरच्या पाण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे नोंदवले गेले आहे.
गंगोत्री ग्लेशियर वितळणे हा केवळ वैज्ञानिक चिंतेचा विषय नाही. तर उत्तर हिंदुस्थानातील जलसुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान गंगा खोऱ्यातील शेतीवर अवलंबून आहे. यावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर होण्याची दाट शक्यता आहे. उंच पर्वतीय भागात आणि मैदानी भागात पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते. संशोधक मोहम्मद फारूक आजा यांच्या मते, बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होणे हे हवामान बदलाचे थेट लक्षण आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन आणि हिमनदी संवर्धनासाठी धोरण आखण्याची वेळ आली आहे असा इशारा यावेळी त्यांनी दिला.