सात-बारावरील नोंदी प्रलंबित ठेवल्यास आता भाऊसाहेबांना द्यावा लागणार जाब

महसूल विभागात सातबारा उताऱ्यावरील विविध प्रकारच्या नोंदी प्रलंबित राहिल्यास त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सनियंत्रण कक्षातून संपर्क साधला जाणार आहे. नोंदीच्या विलंबाची कारणे योग्य नसल्यास संबंधित तलाठी भाऊसाहेब, मंडल अधिकाऱ्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात येणार असून, त्यांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

ज्या तलाठी सर्कल अथवा संबंधित अधिकाऱ्यांकडून नोंदी प्रलंबित राहिल्यास त्यास नोंदीच्या विलंबासाठी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सातबारा उताऱ्यावरील जमीन खरेदी-विक्री,
वारस नोंद करणे, बोजा कमी करणे यासारख्या नोंदी मर्यादित कालावधीत होणे अपेक्षित आहे.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून अनेक कारणास्तव नोंद घेण्यासाठी विलंब होत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांवर लाचलुचपत खात्याकडून कारवाईदेखील करण्यात आली. अर्ज करूनही
अनेकदा नोंदी केल्या जात नाहीत. या सर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्या कक्षामार्फत जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या तलाठी, मंडल अधिकाऱ्याकडे कोणत्या सात-बारा नियंत्रण कक्षातून थेट संपर्क करून विचारणा केली जाणार आहे.

दोन तलाठी नियुक्त
नियंत्रण कक्षामध्ये संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्याला आता संपर्क साधण्यासाठी दोन तलाठ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्या तलाठ्यांमार्फत संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदी प्रलंबित का राहिल्या याची विचारणा करण्यात येणार आहे. प्रलंबित नोंदीबद्दल ठोस कारण देऊ शकले नाही, तर त्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलून विचारणा आणि कारवाई केली जाणार आहे.