मुंबईत लोक कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलनाचा अधिकार! – संजय राऊत

मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, त्यानंतर पुन्हा सरकार आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संयमाने, सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मराठी माणसांना मुंबईत येण्यापासून थांबवू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देते, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठी माणूस त्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणे आणि ऐन गणपतीत मुंबईची कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावर आम्ही राजकारण करत नाही आहोत. जातीजातीत भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झाले. केंद्रात नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम त्यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची भक्कम एकजूट मुंबई, महाराष्ट्रात उभारली. मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शहाण्णवकुळी-ब्यान्नवकुळी, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी ही सर्व मनभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा, असा मंत्र बाळासाहेबांनी दिला होता आणि त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम गेल्या 10 वर्षात झाले. मराठी माणसाची एकजूट टिकू नये यासाठी फडणवीस यांनी राजकारण केले. आज जातीजातीमध्ये, पोटजातीमध्ये आगी लागलेल्या आहेत. रोज कुठे ना कुठे जात विरुद्ध जात संघर्ष पेटल्याची बातमी येते. ही आमच्यासारख्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मराठी एकजुटीसाठी काम केलेल्यांसाठी वेदनादायी आहे.

मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड समाज आहे. ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या सरकारकडे येत आहेत. ते आपल्या मागण्या प्रे. ट्रम्पकडे किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागू शकत नाही. नरेंद्र मोदी किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणार ना. उद्या तुम्ही मुख्यमंत्री नसेल तर दुसरा असेल, त्यांच्याकडे ते मागण्या मांडतील. उद्या पंतप्रधान मोदी नसतील, दुसरे कुणीतरी असेल तर त्यांच्याकडे मागणी केली जाईल. व्यक्तीकडे मागत नाही आहोत. तुम्ही आमचे पालक आहात. तुमच्याकडे काही मागण्या घेऊन मराठी माणसं आले असतील तर त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागेल. कारण हे आंदोलन सोपं नाही. लाखोंच्या संख्येने मराठी माणूस येत असेल तर त्यांच्याशी थेट संवाद साधल्याशिवाय शांतता राहणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आज गेल्या 10-11 वर्षापासून आपण सत्तेवर आहात. आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे. केंद्रात दहा वर्ष मोदी आहेत. हा केंद्राच्या अखत्यारितला विषय आहे. नरेंद्र मोदी काय करताहेत? आश्वासनं देत फिरताहेत, लोकांना टोप्या घालत फिरताहेत. फडणवीस नाही म्हटले तरी पाच वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री आहात ना. तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती म्हणजे हे खापर फोडू शकत नाही. तुम्ही पंडीत नेहरूंवरही याचे खापर फोडू शकत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहेत. ते काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा सत्तेत होते, त्याच्याआधी शिवसेनेचे सरकार होते, त्यात ते सत्तेत होते. एकनाथ शिंदेही अनेक काळ सत्तेत आहेत. तेव्हा शरद पवार काय करताहेत, उद्धव ठाकरे यांनी काय केले हे प्रश्न निरर्थक आणि मूर्खपणाचे आहेत, असेही राऊत म्हणाले.

राज्याचे प्रमुख म्हणून बहुमताचे सरकार चालवत आहेत आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही, दोन उपमुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा ज्या वातावरण भविष्यात बिघडणार आहे ते थांबेल असे माझे मत आहे, असेही संजय राऊत स्पष्ट म्हणाले.