भाजप उपाध्यक्षांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप, महिलेच्या लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ

भारतीय जनता पक्षाचे केरळमधील उपाध्यक्ष सी. कृष्णकुमार यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने हा आरोप केला असून याबाबत तिने भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना पत्र लिहिले आहे. यामुळे केरळच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

सी. कृष्णकुमार हे अनेक दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय असून पलक्कड मतदारसंघातील प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. काँग्रेसविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अशातच एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत थेट प्रदेशाध्यक्षांना इमेलद्वारे एक पत्र पाठवले आहे.

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले की, काही वर्षांपूर्वी कृष्णकुमार यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. हा प्रकार आपण आरएसएसच्या एळमक्करा कार्यालयातील गोपालनकुट्टी मास्टर, व्ही. मुरलीधरन, एम.टी. रमेश आणि त्यावळेचे संघटने महामंत्री सुभाष यांच्या कानावर घातला होता. वरिष्ठ नेत्यांनी कृष्णकुमार यांच्यावर कारवाईचे आश्वासनही दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपल्याला अपमानित आणि एकाकी वाटत आहे.

काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिल यांच्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा कृष्णकुमार यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजपने त्यांना पक्षातून हाकलून द्यावे, अशी मागणीही पीडित महिलेने केली. विशेष म्हणजे राहुल ममकुटाथिल यांच्यावर एका अभिनेत्रीने अश्लील वर्तनाचा आरोप केला होता. यावरून भाजपने रान उठवलेले असतानाच आता त्यांच्याच उपाध्यक्षावर महिलेने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते संदीप जी. वॉरियर यांनीही ट्विट करत भाजपला घेरले आहे.

आरोप फेटाळले

दरम्यान, कृष्णकुमार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून सर्व आरोप फेटाळून लावले. मालमत्तेच्या वादातून हा आरोप करण्यात येत आहे. तक्रारदार महिला नातेवाईक असून कुटुंबातील मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाशी या प्रकरणाचा संबंध आहे. या संदर्भात न्यायालयात खटला सुरू होता आणि निकाल माझ्या बाजुने लागला. आता राजकीय हेतूने बनावट तक्रारीद्वारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, मात्र मी घाबरणार नाही, असे कृष्णकुमार म्हणाले.