चांदी, एटीएमपासून क्रेडिट कार्डपर्यंत… 1 सप्टेंबरपासून खिशावर थेट परिणाम

1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. चांदी खरेदी करत असाल किंवा एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर खरेदी करत असाल, या बदलांचा थेट परिणाम खिशावर होईल. नेमका काय आणि कसा बदल होईल, ते जाणून घेऊया.

चांदीच्या नियमांमध्ये बदल

1 सप्टेंबरपासून चांदीवर हॉलमार्किंग लागू होऊ शकते. याचा अर्थ, ग्राहक चांदीची शुद्धता आणि गुणवत्ता सहज ओळखू शकतील. यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक आणि दागिने खरेदी करण्यामध्ये आता अधिक पारदर्शकता येईल.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरची किंमत बदलते. 1 सप्टेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर तेल कंपन्यांनुसार निश्चित केले जातील. जर किमती वाढल्या, तर स्वयंपाकघराचे बजेट थोडे वाढेल. जर दर कमी झाले, तर सामान्य जनतेला दिलासा मिळेल.

एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

1 सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलत आहेत. क्रेडिट कार्डने बिल पेमेंट, इंधन खरेदी किंवा ऑनलाइन शॉपिंगवर आता अधिक शुल्क लागू शकतो. ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2 टक्के दंड लागेल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यासोबतच, रिवॉर्ड पॉइंट्सचे मूल्यही कमी होण्याची शक्यता आहे.

जन धन खातेधारकांसाठी केवायसी आवश्यक

आरबीआयच्या सूचनेनुसार, पंतप्रधान जन धन योजनेच्या खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा केवायसी करावे लागेल. सार्वजनिक बँकांद्वारे पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित केली जात आहेत. या प्रक्रियेत वैयक्तिक आणि पत्त्याची माहिती अपडेट केली जाईल. यामुळे खात्यांचा रेकॉर्ड नेहमी अचूक राहील.

कॅशलेस उपचार बंद

असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने सेवा निलंबित करण्याच्या निर्णयामुळे बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स आणि केअर हेल्थ इन्शुरन्सच्या लाखो पॉलिसीधारकांसाठी 1 सप्टेंबरपासून कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा बंद होणार आहे.

पोस्टाची नोंदणी सेवा

पोस्ट खात्याची रजिस्टर्ड सेवा 1 सप्टेंबर 2025 पासून बंद होणार असून ती आता स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे. टपाल प्रक्रिया अधिक सुलभ व एकसंध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.