
हिंदुस्थानचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर, आयपीएलमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली. आयपीएल निवृत्तीनंतर तो विदेशी लीग्समध्ये खेळण्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र आता अश्विनने स्पष्ट केले आहे की प्रशिक्षकपद हा त्याचा पुढील टप्पा असू शकतो. 38 वर्षीय अश्विनने आपली आयपीएल कारकीर्द चेन्नई सुपर किंग्ससोबत समाप्त केली.
आपल्या यूटय़ूब चॅनेल ‘ऐश की बात’वर बोलताना अश्विन म्हणाले, मी खूप आवेगशील आहे. जेव्हा मी एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतो, तेव्हा मी त्याच्या मागे धावतो. आता मी खेळामध्ये आनंदाच्या मागे धावत आहे. माझा पुढील अध्याय कदाचित प्रशिक्षण असू शकतो. मी त्यास खूप महत्त्वाचे साधन मानतो. मला विश्वास आहे की खेळ मला त्यासाठी तयार करत आहे.
अश्विनने आणखी खुलासा केला की राजस्थान रॉयल्समध्ये खेळताना त्याला खेळाडूसोबत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडता येईल का याबाबत चर्चा झाली असल्याचेही त्याने सांगितले.
राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना आम्ही या विषयावर चर्चा केली होती की एखादा क्रिकेटपटू खेळताना एकाच वेळी कोचिंगची भूमिका पार पाडू शकेल का? मी कोणाचे नाव घेणार नाही, पण ही चर्चा झाली होती. मात्र ही गोष्ट पुढे गेली नाही. अश्विनच्या या निर्णयामुळे हिंदुस्थान क्रिकेटच्या भविष्याची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि खेळाडूंपासून कोचपर्यंतच्या या संक्रमणावर सर्वांचे लक्ष आहे.