
>> सनत्कुमार कोल्हटकर
शेती उद्योग हा जागतिक स्तरावरच संकटांनी भरलेला उद्योग आहे. शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांची सांगड बघता इतर उद्योगांपेक्षा हा उद्योग आतबट्टय़ाचा असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, रासायनिक खतांमुळे जमिनीची बाधित होणारी सुपीकता आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती या व्यवसायाकडे नव्याने वळणारे लोक कमीच दिसतात. त्यात कापूस, सोयाबीन आणि मका यांच्या अमेरिकन जनुकीय बियाणांना भारताची बाजारपेठ खुली करण्याच्या ट्रम्प यांच्या दबावाच्या संकटाची भर पडली आहे.
मक्याच्या पिकाचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पादन आहे 1 ते 1.25 टन, तर अमेरिकेतील हेच मक्याचे हेक्टरी उत्पादन आहे 3.5 टन. जर भारताला अमेरिकेच्या जनुकीय सुधारित मक्याचे भारतात उत्पादन घ्यावयाचे असेल आणि त्याचा बहुतांश वापर इथेनॉलसाठी करावयाचा असेल तर त्याचा विचार करता येऊ शकतो. तसेच सोयाबीनचे अमेरिकेतील हेक्टरी उत्पादन आहे 3.5 टन, तर भारतातील हेच उत्पादन आहे 2 ते जास्तीत जास्त 2.5 टन. हीच गोष्ट कापसाच्या प्रति हेक्टरी उत्पादनाची. भारतात प्रति हेक्टर 450 किलो उत्पादन निघते, तर अमेरिकेत हेच उत्पादन प्रति हेक्टरी 900 ते 1000 किलो निघते. कापसाच्या बियांमधून निघणारे तेल वगळता बाकीचा चोथा जनावरांना खाद्य म्हणून देतात. याचा जनावरांवर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष आलेला नाही. जेनेटिक इंजिनीअरिंग अप्रेजल कमिटी आणि पर्यावरण मंत्रालय या दोघांनी मिळून यासाठीची मान्यता द्यावी. मका, सोयाबीन आणि कापूस यांच्या अमेरिकेतून होऊ शकणाऱया आयातीमुळे भारतामध्ये उत्पादित या गोष्टींचा भारतातील स्थानिक विक्री किमतीवर परिणाम होणार असेल तर त्या पार्श्वभूमीवर भारताने तत्सम गोष्टींना आयातीची परवानगी देऊच नये.
स्वित्झर्लंडमधील सिंजेंटा या बहुराष्ट्रीय कंपनीवर 2007 मध्ये चीनमधील केम चायनाकडून (चायना नॅशनल केमिकल कॉर्पोरेशन) ताबा घेण्यात आला होता. स्वित्झर्लंडची जगप्रसिद्ध महाकाय अशी संकरित बी-बियाणे, कीटकनाशक बनविणारी कंपनी सिंजेंटा तब्बल 44 बिलियन डॉलर्स देऊन केम चायनाने (चायना नॅशनल केमिकल कॉर्पोरेशन) विकत घेतली. सिंजेंटा ही युरोपातील संकरित बी-बियाणे व पीक संरक्षक कीटकनाशके बनविणारी महाकाय कंपनी असून या कंपनीत जगभर एकूण हजारो लोक काम करतात. सिंजेंटाकडे कृषी संशोधन क्षेत्रातील 13 हजार पेटंट आहेत. कंपनीची 107 उत्पादन केंद्रे असून 119 संशोधन व विकास केंद्रे असून जगात 90 देशांत पसरली आहेत. आता केम चायनाला जागतिक पातळीवर स्पर्धा आहे ती डय़ू पॉन्ट व बायर एजी या दोन तेवढय़ाच महाकाय कंपन्यांची. डो केमिकल या जगप्रसिद्ध कंपनीवर डय़ू पॉन्टने ताबा मिळविल्याने व बायर एजीने मोन्सॅन्टोवर ताबा मिळविल्याने या दोन्ही कंपन्यांचे मोठे तगडे आव्हान केम चायनापुढे असणार आहे. केम चायनाने फ्रान्स , ब्रिटन, इस्रायल, जर्मनी व इटली येथील या क्षेत्रातील नऊ इतर कंपन्याही विकत घेतल्या आहेत.
गेली काही वर्षे चीन हा जागतिक बी-बियाणे कंपन्यांवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रचंड लोकसंख्येची भविष्यातील अन्नाची गरज भागविण्यासाठी चीनचा हा आटापिटा असू शकतो. अन्न सुरक्षा तज्ञ रॉब बेले यांच्या मतानुसार शेतीवर अवलंबून असणारा व शेतीमध्ये काम करणारा बहुतांश चिनी माणूस हा वय वर्षे पन्नाशीपुढचा असून त्यासोबतच वाढत जाणारे हवा व पाण्याचे प्रदूषण, मातीचे वाढणारे क्षपण (घटत जाणारा कस) हीदेखील मोठी आव्हाने आहेत.
कापूस बियाण्यांना भारतात यापूर्वीच व्यावसायिक उत्पादनासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगतात, पण जनुकीय बदल केलेले सोयाबीन आणि मका हे गायी आणि म्हशी यांसारख्या जनावरांना खाद्यान्न आणि प्रक्रिया केलेले खाद्यान्न म्हणून देण्यात यावे यासाठी अमेरिकेतील बियाणे उत्पादक कंपन्या प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत त्यांचा जनावरांसाठी खाद्यान्न म्हणून सर्रास उपयोग केला जातो, पण या अशा खाद्यान्नाचा जनावरांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम काय असू शकेल, याबद्दल या क्षेत्रातील तज्ञांची मते विचारात घेणे आवश्यक आहे. भारतातील शेतकऱयांना आपली पूर्वीपासून चालत आलेली बी-बियाणे जपून ठेवण्याची सवय आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी कोणत्या विदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
सुधारित आणि आयात केलेल्या बी-बियाण्यांचा विचार करता प्रत्येक वेळेला शेतकऱयाला हे बी-बियाणे या कंपन्यांकडूनच विकत घ्यावे लागेल. उत्पादित शेतमालातील बी-बियाणे ही नवीन रोपांना जन्म देऊ शकत नाहीत. भारतात 70 टक्के ग्रामीण शेती आहे. तेथील शेतकऱ्यांना दरवेळी बी,बियाण्यांसाठी या परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागेल. या कंपन्यांची या क्षेत्रातील बी-बियाण्यांची उपलब्धता आणि किमती यांच्यावर मत्तेदारी असेल ते वेगळेच. सदासर्वदा शेतकऱ्यांना या कंपन्यांच्या अधीन राहावे लागेल.
अमेरिका आणि भारत यांच्यामधील व्यापार करारातील जेनेटिकली मॉडिफाईड जनुकीय फेरफार केलेल्या बी-बियाण्यांच्या खरेदीला भारताने सपशेल नकार दिलेला आहे. या मुद्दय़ावर भारताने कोणत्याही प्रकारे समझोता करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
बांगलादेश आणि अनेक गरीब आफ्रिकी देशांना असे बी-बियाणे विकण्यात अमेरिकेला यश मिळते आहे. या अशा बी-बियाण्यांमुळे माणसाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांची यादी मोठी असेल. शेती उद्योग हा जागतिक स्तरावरच संकटांनी भरलेला उद्योग आहे.
शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांची सांगड बघता इतर उद्योगांपेक्षा हा उद्योग आतबट्टय़ाचा असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, रासायनिक खतांमुळे जमिनीची बाधित होणारी सुपीकता आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती या व्यवसायाकडे नव्याने वळणारे लोक कमीच दिसतात अथवा नाहीच म्हटले तरी चालेल. त्यामुळे शेतीतील उत्पादकताही कमी झालेली आहे. वंशाने चालत आलेली शेती करणारेच शिल्लक आहेत आणि त्यातीलही अनेक या व्यवसायातून बाहेर पडू इच्छितात हे वास्तव आहे. शेती उत्पादनाची बाजारपेठेपर्यंतची वाहतूकही महाग झालेली आहे. काही वेळा तर उत्पादित पदार्थांच्या बाजारभावापेक्षा हा वाहतूक खर्च जीवघेणा ठरतो आहे.
त्यामुळे छोटय़ा शेतकऱयांना शेती करणे अतिशय अवघड झालेले आहे. अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपातील देशांमध्ये अनेक मोठी बिझनेस हाउैसेस शेती व्यवसायाकडे वळलेली दिसतात. शेकडो एकर जमिनीतून यांत्रिकीकरणातून मोठे उत्पादन घेण्याची स्पर्धा लागलेली दिसते आहे. नफ्याला महत्त्व दिल्याने भविष्यात यातून उत्पादित पदार्थांच्या किमती अवाच्या सवा वाढतील हे वेगळे सांगणे न लगे.
संपूर्ण जगातील वाढतच जाणाऱया लोकसंख्येला अन्नधान्य पुरवायचे कसे, यावर अमेरिकेत चर्चासत्रे घेतली जात आहेत. गोष्टी शेतमालावरून ते कृमी, कीटकांपर्यंत आलेल्या दिसतात. अगदी कोणते कीटक कसे खाल्ले असता त्यामधून कोणती प्रथिने मानवाच्या शरीराला मिळतात यावर अमेरिकेत जोरदार जाहिरातबाजी चालू आहे आणि त्यामध्ये हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री या अशा गोष्टींचा प्रचार करताना दिसतात. मध्यंतरी अँजेलिना जोली ही अभिनेत्री कीटक आणि कृमी यांच्याकडे खाद्यान्न म्हणून बघितले पाहिजे अशी जाहिरात एका चित्रफितीमध्ये करताना दिसली होती. अमेरिकेत अनेक फूड मार्केटमध्ये वर उल्लेखलेले कीटक आणि कृमी पॅकबंद स्थितीत विक्रीला उपलब्ध केलेले दिसतात.