लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

‘राजकारणात मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौशे, नवशे, गवशे आहेत. त्यातला जो कोणी लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवू शकतो, तोच खरा नेता,’ हे सत्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राजकारणातील वास्तव मांडले. ‘बोलणे हे कृतीपेक्षा नेहमीच सोपे असते. मात्र राजकारणात खरे बोलण्यावर बंदी आहे. मनापासून एखादी गोष्ट बोलणे हे तिथे अडचणीचे ठरते. हौश, नवशे, गवशे असे सगळे लोक येथे असतात. प्रत्येकाची स्वतःची शैली आणि हेतू असतो. शेवटी जो लोकांना सतत मूर्ख बनवून एखादी गोष्ट त्यांच्या गळी उतरवतो, तोच यशस्वी ठरतो, असे गडकरी म्हणाले.

पण अंतिम विजय सत्याचाच!

एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट आहे. नियम मोडून शॉर्टकटने माणूस लवकर जाऊ शकतो. एखादा रस्ता क्रॉस करताना सिग्नल तोडून, उडी मारून जाताही येईल, पण हा शॉर्टकट धोकादायकही ठरू शकतो. शॉर्टकटचे आयुष्य कमी असते. त्यामुळेच आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, समर्पण, सुसंस्कृतपणा, सत्यनिष्ठा हे गुण असायलाच हवेत. कारण, अंतिम विजय हा सत्याचाच होतो हे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगून ठेवलंय, हेही गडकरींनी स्पष्ट केलं.