
सोलापुरात गॅसगळतीमुळे एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. हर्ष बलरामवाले, अक्षय बलरामवाले, विमल मोहनसिंह बलरामवाले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, युवराज मोहनसिंह बलरामवाले व रंजना युवराज बलरामवाले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
याबाबत माहिती अशी की, लष्कर परिसरातील नळ बाजार येथे राहणारे बलरामवाले हे एका खोलीत कुटुंबीयांसह राहतात. रात्रीच्या सुमारास पत्नी रंजना, मुले हर्ष (वय 6), अक्षय (वय 4), आई विमल (वय 60) हे सर्वजण जेवण करून झोपले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत युवराज बलरामवाले यांचे कुटुंबीय बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी घराचे पत्रे उचकडून आत पाहिजले असता पाचही जण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. प्रत्येकाच्या तोंडाला फेस येत असल्याने तातडीने उपचारासाठी सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान हर्ष, अक्षय व त्यांची आजी विमल यांचा मृत्यू झाला. तर युवराज बलरामवाले व पत्नी रंजना यांच्यावर उपचार चालू असून प्रकृत्ती चिंत्ताजनक आहे.
प्राथमिक तपासात रात्रीच्या वेळेच्या स्वयंपाकाची गॅस शेगडी व्यवस्थित बंद न केल्याने गॅस लिकेज झाला व गुदमरून पाचजण बेशुद्ध पडले होते. गॅस श्वसनाद्वारे शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसांना इजा झाल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर बाझार पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.