
चीनच्या तिआनजिन शहरात सुरू असलेल्या 25 व्या शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला फटकारले. दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणारा देश आपल्यापैकी कुणालाही स्वीकारार्ह वाटेल का, असा सवाल करतानाच आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढायला हवे, त्याचा विरोध केला पाहिजे, मानवतेप्रती हीच आपली जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ हिंदुस्थानचा आत्मा असलेल्या जम्मू आणि कश्मीरवरच हल्ला नव्हता तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांना उघडपणे आव्हान होते, असेही ते म्हणाले. हिंदुस्थानने संयुक्त माहिती अभियानांचे नेतृत्व करून दहशतवादी संघटनांविरोधात लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहशतवादासाठी शेजारील देशांकडून वित्तपुरवठा केला गेला, त्याविरोधातही आवाज उठवला गेला. या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले.
चार दशकांपासून हिंदुस्थानला फटका
गेल्या चार दशकांपासून हिंदुस्थान दहशतवादाचा फटका सहन करत आहे. त्यामुळे अनेकांनी जीव गमावले. तसेच अनेक मुले अनाथ झाली. अलीकडेच पहलगाममध्ये आपण दहशतवादाचे अत्यंत घृणास्पद स्वरूप पाहिले. या दुःखाप्रसंगी आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या मित्र राष्ट्रांचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे दुर्लक्ष
मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चा केली. पुतीन यांची मोदींनी बैठकीपूर्वी गळाभेट घेतली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे मात्र सर्वच जागतिक नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. मोदी हे पुतीन यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे उदास चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.